‘कोकण पदवीधर’ मतदानादिवशी २६ जून रोजी विशेष नैमित्तीक रजा मंजूर

रत्नागिरी:- कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी 26 जून रोजी पदवीधर मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.) कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2024 च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार दि.26 जून 2024 रोजी सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी दिनांक 1 जुलै, 2024 रोजी होणार आहे.
विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी पदवीधर तसेच शिक्षक निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तीक रजा जाहीर करण्यात आली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार आहे.

या रजेबाबतचा शासन निर्णय www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहीर करण्यात आलेल्या नैमित्तीक रजेचा लाभ घेऊन पदवीधर तसेच शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे.