जिल्ह्यात दहा वर्षात खाद्य पिकाखालील क्षेत्रात मोठी घट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात खाद्य पिकाचे क्षेत्र कमी झाले असले तरी ओलिताखालचे क्षेत्र वाढले आहे. मागील दहा वर्षात खाद्य पिकांखालील क्षेत्र 1 हजार 904 हेक्टरने कमी झाले आहे. त्याचवेळी खाद्य पिकांखालचे ओलीत क्षेत्र 11 हजार 499 हेक्टरने वाढले आहे. पाण्याचा साठा ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असतो त्या जमिनीला ओलीताखालचे क्षेत्र असे म्हणतात.
विहिरी, शेततळी, धरणाद्वारे, पाट, कालवा आदी सोयींमुळे ओलीताखालचे क्षेत्र वाढत आहे. ओलीताखालच्या क्षेत्रात अनेक पिके घेतली जावू शकतात. खाद्य पिकांमध्ये भात, नाचणी, वरी, कुळीथ, नागली, वाल, भाजीपाला अशी खाण्यायोग्य पिके घेतली जातात त्यांना खाद्य पिके असे म्हटले जाते. पावसाळा संपला तरी अशा ओलीताखालच्या क्षेत्रात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पिके घेता येतात.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन 2012 – 13 मध्ये खाद्य पिकाखालचे क्षेत्र 2 लाख 69 हजार 458 हेक्टर इतके होते. कृषी अधिकार्‍यांकडील नोंदीनुसार सन 2022 – 23 मध्ये हे क्षेत्र 1 हजार 904 हेक्टरने कमी होऊन 2 लाख 67 हजार 554 हेक्टर इतके झाले आहे.
खाद्य पिकाखालचे क्षेत्र कमी झाले असले तरी ओलीताखालचे क्षेत्र मात्र तब्बल 11 हजार 499 हेक्टरने वाढले आहे. दहा वर्षापूर्वी ओलीताखालचे जे क्षेत्र 14 हजार 72 हेक्टर इतके होते ते आता 25 हजार 771 हेक्टर इतके झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील ओलीताखालचे क्षेत्र वाढले आहे. मंडणगड तालुक्यात दहा वर्षांपूर्वी ओलीताखालचे क्षेत्र 1 हजार 98 हेक्टर इतके होते ते आता 1 हजार 602 हेक्टर इतके झाले आहे. दापोली तालुक्यात 1 हजार 992 हेक्टरचे क्षेत्र 2 हजार 684 हेक्टर झाले आहे. खेडमध्ये 1 हजार 371 हेक्टरचे क्षेत्र 2 हजार 807 इतके झाले आहे. चिपळूणमध्ये 1 हजार 981 हेक्टर क्षेत्र 2 हजार 766 इतके झाले आहे.

गुहागर तालुक्यात ओलीताखालचे क्षेत्र 1 हजार 652 इतके होते ते आता 1 हजार 989 इतके झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात 1 हजार 976 हेक्टर क्षेत्र वाढून ते आता 4 हजार 231 हेक्टर इतके झाले आहे. संगमेश्वरातील 1 हजार 282 हेक्टरचे क्षेत्र आता 3 हजार 496 हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. लांजातील 1 हजार 224 हेक्टरचे क्षेत्र 2 हजार 934 हेक्टरपर्यंत वाढले आहे. राजापूर तालुक्यात दहा वर्षांपूर्वी ओलीताखालचे क्षेत्र 1 हजार 496 इतके होते ते आता 3 हजार 60 हेक्टर पर्यंत वाढले आहे.