मिऱ्या ग्रामस्थांची पतन कार्यालयावर धडक

 रत्नागिरी : शहराजवळील मिऱ्या गावात महत्त्वाच्या ठिकाणी उपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध असूनही हा बंधारा अद्यापही उभारलेला नसल्याने मिऱ्यावासियांना धोका निर्माण झालेला आहे. पाऊस आला तरी त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या मिऱ्या ग्रामस्थांनी आज (१२ जून) पतन विभागाच्या कार्यालयावर धडक देत याचा जाब विचारला आणि तातडीने हे काम पूर्ण करून देण्याची मागणी केली. त्यानंतर याबाबत लवकरात लवकर उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन पतन विभागाच्या अधिकाऱ्याने दिले. 

पावसाळ्यातील सागरी अतिक्रमणाच्या भीतीने गेल्या अनेक वर्षांपासून मिऱ्यावासीय धास्तावलेले आहेत. त्यांच्या मागणीनुसार काही प्रमाणात लोकप्रतिबंधक बाजाराची उभारणीही करण्यात आली आहे; मात्र महत्त्वाच्या ठिकाणी उपप्रतिबंधक बंधारा अद्यापही उभारलेला नाही त्यामुळे मिऱ्यावासियांना धोका निर्माण झालेला आहे. या धोकादायक टप्प्यातील बंधाऱ्याचे काम करण्यासाठी निधीही उपलब्ध झालेला आहे, परंतु अद्यापही या बंधाऱ्याचे काम सुरू झालेले नाही. म्हणून मिऱ्या भााटिमिऱ्या गावातील ग्रामस्थ छोट्या भाटकर, राजू भाटकर, मुरलीधर पन्हळेकर,सुनील कांबळे, मनोज पानगले,अनिल पानगले,विजय तळेकर, नागेश कांबळे, बाबू कांबळे, दत्तगुरु कीर आदींनी पतन विभागात जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

मिऱ्या गावातील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले असले तरी ज्या ठिकाणी सर्वाधिक धोका आहे अशा ठिकाणी मात्र अद्यापही बंधारा पूर्ण झालेला नाही. हा बंधारा मंजूर आहे तसेच त्याच्यासाठी आवश्यक निधीही मंजूर आहे. तरीही या कामात दिरंगाई का होत आहे, असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना केला. पांढरा समुद्र ते जय हिंद चौक पर्यंतचा सुमारे 250 मीटरचा धूप प्रतिबंधक बंधारा अद्यापही व्हावयाचा आहे. मात्र तो न झाल्याने नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तांना धोका निर्माण झाला आहे. मिऱ्या गावच्या संरक्षणासाठी मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा समुद्री धूप प्रतिबंधक बंधारा उभारला जात असून त्यातील पांढरा समुद्र ते जयहिंद चौक पर्यंतचा अडीचशे मीटरचा बंधारा अद्याप पूर्ण होणे बाकी आहे.

समुद्राचा प्रवाह बदलल्यामुळे त्याचा त्रास सध्या मिऱ्या गावाला भोगावा लागत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूप होऊन मानवी वस्तीत पाणी शिरण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. यावेळीही असा धोका आहे. उधाण भरतीच्या वेळी गावात मानवी वस्तीत पाणी आत येत असल्यामुळे नागरीक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र हे अडीचशे मीटरचे काम नेमके कशामुळे रखडले याची माहिती आता पुढे येत आहे. या अडीचशे मीटरच्या क्षेत्रातील काही जागेबाबत जागामालकांची तक्रार होती. मात्र अलीकडेच त्यांनी या बंधाऱ्यासाठी जागे बाबतची आपली तक्रार मागे घेत मान्यता दिली आहे. मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने पावसात या ठिकाणी काम करणे सोपे नाही. त्यामुळे हे काम आता पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत तात्पुरती डागडुजी किंवा दुरुस्तीच्या स्वरूपात काम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.