अणुस्कूरा घाटात दरड कोसळली; वाहतूक आंबा घाट मार्गे वळवली

रत्नागिरी:- जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्री राजापूर तालुक्यातील अणुस्कूरा घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक आंबा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीने ही दरड बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. मोठे खडक फोडून ही दरड हटवण्यासाठी ब्लास्टींग मशीनदेखील घटनास्थळी मागवण्यात आले आहे. ही दरड हटवल्यानंतर या मार्गावरुन होणारी वाहतूक सुरु केली जाईल. तोपर्यंत आज रात्री अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद केला आहे, अशी माहिती राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.