शासनाच्या कौशल्य विकास केंद्राच्या डिन, प्राचार्य, शिक्षकासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाद्वारे रत्नागिरीतील शासकिय तंत्रनिकेतनच्या आवारात सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बनावट कार्डच्या सहाय्याने बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रत्नागिरील जागरूक नागरिकांनी उघड केला आहे. संबधीत प्रकाराची तक्रार अभाविपचे सुमित मिलिंद पाध्ये यांनी शहर पोलीसांकडे केली असून पोलीसांनी कौशल्य केंद्राचे डीन अमोल गोठकडे, प्राचार्या रचना व्यास, श्रीनिवास माने या तिघांसह एकूण आठ जणांविरोधात भादंविक ४२०, ४६५, ४६८, ४७१, २०१, ३४ सह गुन्हा दाखल केला आहे.

शासनाकडून रत्नागिरीत चालवल्या जाणार्‍या कौशल्य विकास केंद्रामध्ये बोगस प्रशिक्षणार्थी बसवून परिक्षा घेतल्या जात दिसून येत आहे. ज्यामध्ये विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेण्यार्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखवण्याचे काम सुरु आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी विद्यार्थ्याची बनावट कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी त्या बनावट विद्यार्थ्यांना बसवण्यात येत आहे. याप्रकरणी अभाविपचे पदाधिकारी आणि जागरूक नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी मंगळवारी हा प्रकार उघडकीस आणला. अभाविपने स्थानिक पोलीसांकडे याबाबत लेखी निवेदन दिले आहे. त्यांनतर शहर पोलीसांचे पथक कौशल्य विकास केंद्रात दाखल झाले होते. पोलीसांनी तेथे परिक्षेला बसलेल्या प्रशिक्षणार्थींची माहिती संकलीत केली आहे. रात्री उशिरा शासनाच्या कौशल्य विकास केंद्राच्या डिन,प्राचार्य, शिक्षकासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.