वाटूळ येथे वाळूने भरलेला डंपर पलटी होऊन चालक ठार; अपघातानंतर ट्रक जळून खाक

राजापूर :- मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ नजीकच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर पलटी होवून झालेल्या अपघातात डंपर चालक जागीच ठार झाला. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर डंपरच्या केबीनने पेट घेतल्याने डंपर जळून खाक झाला.

ओणी येथून विलवडेकडे वाळू भरून जात असताना वाटूळ येथील तीव्र उतारावरील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाळूने भरलेला डंपर नजीकच्या 25 ते 30 फुट खोल दरीत कोसळला. दरम्यान या अपघातात चालक जागीच ठार झाला. अपघाताची तिव्रता एवढी होती कि डंपर चालकाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. कंबरेखालील भाग डंपरमध्ये अडकला होता. तर धड वेगळे होवून बाहेर फेकले गेले. अपघातानंतर डंपरच्या केबीन आणि ट्रॉलीचे दोन भाग होवून केबीन जळून खाक झाली.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजापूर नगर परिषदेच्या अग्नीशमन बंबाने पेट घेतलेला डंपर विझविण्यात आला.