जिल्हा रुग्णालयातील रूम आशा, गटप्रवर्तकांच्या ताब्यात

रत्नागिरी:- आशा व गटप्रवर्तक महिला संघटनेने आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी जिल्हा परिषदला निवेदन दिले. तसेच जिल्हा शासकीय रूग्णालयातील आशा सेविकांसाठी ठेवलेली रूम तत्काळ मिळावी यासाठी आशा संघटनांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यांनीही तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी सकारात्मक चर्चा करत ती रूम पुन्हा आशा मिळवून दिली.

जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांना संघटनेच्यावतीने आशा व गटप्रवर्तक महिलांनी दोन स्वतंत्र निवेदन दिली.
या प्रसंगी शिष्टमंडळाशी चर्चा करताना डॉ. आठल्ये यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या प्रमुखांपुढे आशा सेविकांची रूम पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा केली.

याविषयी अधिष्ठाता यांनीही दूरध्वनीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांना सांगितले, तेथील रूम आशांसाठी पूर्ववत सुरू करण्यात येईल. आशा महिलांना आजपर्यंत पाच हजार रुपये वाढीव मानधन अद्याप मिळालेले नाही. एप्रिल व मे जूनमधील पूर्वीचे मानधन मिळालेले नाही. या बाबत तातडीने मुंबई राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे निवेदन पाठवून देण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
गटप्रवर्तक महिलांचे निवेदन सुद्धा देण्यात आले. गटप्रवर्तक महिलांची एकूण सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे, त्यांचे समायोजन करण्यात यावे. तसेच ज्यांची दहा वर्षे पूर्ण झालेली नाहीत, त्यांना कमाला समान वेतन मिळावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. तसेच 1 हजार मानधन रद्द करून दहा हजार रुपये मानधन वाढ मिळावी अशी मागणी केली.
या विषयीचे निवेदन मुंबईला पाठवून देण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला डॉ. आठल्ये यांनी दिले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी, जिल्ह्यातील प्रमुख आशा पदाधिकारी पल्लवी पारकर, वृंदा विखारे, ज्योती नारकर, भाग्यश्री भागडे, विनया चव्हाण व संजया लाड उपस्थित होत्या.