काळबादेवी, कुणकेश्वर पुलांच्या उभारणीसाठी ठेकेदार कंपनीची नियुक्ती

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावर असलेल्या कुणकेश्वर आणि काळबादेवी येथील दोन नवीन पुलांच्या बांधकामासाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. रत्नागिरी काळबादेवी सागरी पुलासाठी २९१.६४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस-रेड्डी सागरी किनारा मार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला आहे. या सागरी महामार्गासाठी नऊ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा सागरी महामार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तर २३ ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. या महामार्गावरील खाड्या आणि नद्या ओलांडण्यासाठी किमान 8 नवीन पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च २०२४मध्ये तीन वर्षांच्या बांधकाम मुदतीसह टेंडर मागवली होती. कमर्शियल टेंडरमध्ये सर्वात कमी बोलीदार म्हणून विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही खाडीपुलांच्या कामाचा नारळ फोडण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. या सागरी महामार्गावर कुणकेश्वर येथे एक पूल बांधण्यात येणार आहे. १.६ किमी लांबीचा हा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येईल. त्यामध्ये १६५ मीटर लांबीच्या मुख्य स्पॅनसह ३३० मीटर लांबीच्या आयकॉनिक पुलाचा समावेश आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात २ लेन असलेला १.८ किमी लांबीचा काळबादेवी पूल येथील खाडीवरील काळबादेवी बीच आणि सडामिऱ्याला जोडेल. काळबादेवी येथे पूल उभारण्यासाठी आवश्यक चाचपणी गतवर्षी करण्यात आली आहे. याठीकाणी पाच पिलर उभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील किनाऱ्यालगतच्या अरुंद गावठाणातून हा मार्ग जाणार आहे. रेवसला सागरी मार्गाची सुरुवात होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होईल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रेवस-रेड्डी सागरी रस्त्याचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. आराखड्याला १६ मे २०२२ रोजी मंजुरी देण्यात आली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. नव्याने तयार केलेल्या ४९८ किलोमीटर लांबीच्या आराखड्यात काही रस्त्यांचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तर उर्वरित मार्ग दुपदरी आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग विकसित केला जाणार आहे. ३३ प्रमुख गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते तयार केले जाणार आहेत. एमएसआरडीसीने रेवस ते रेड्डी या ४४७ किमीच्या सागरी किनारा मार्गावर आठ खाडीपूल बांधण्याचे नियोजन केले आहे.