विजेचा शॉक लागून दोन गुरांचा मृत्यू

राजापूर:- जमिनीवर पडलेल्या प्रवाहीत विजवाहिनीचा धक्का बसून दोन गुरांचा जागीच मृत्यु झाला आहे. सोमवारी सकाळी शहरानजीकच्या धोपेश्वर कप्पलवाडी येथे ही दुर्घटना घडली. साक्षी सुहास धुळप यांच्या मालकीची ही गुरे आहेत.

राजापुरात गेले चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यात धोपेश्वर कप्पलवाडी येथे झाड पडून विजेची प्रवाहीत तार तुटून जमिनीवर पडली. दरम्यान सकाळी धोपेश्र्वर कपल वाडी साक्षी सुहास धुळप यांची गुरे चरावासाठी बाहेर पडली. यावेळी यातील दोन गुरांना शॉक लागून ती गुरे जागीच मृत झाली. मृत गुरांमध्ये एक पाडा आणि एक गाभण गाय यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती धुळप यांनी महसुल विभागाला दिली आहे. याप्रकरणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसिलदार शितल जाधव यांनी दिले आहेत.