जिल्हा परिषद भरतीला पुन्हा खो; पुन्हा आचारसंहितेचा अडथळा

रत्नागिरी:- गेले अनेक महिने रखडलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला मुहूर्त मिळाला होता. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांची लेखी परीक्षा 10 जूननंतर होणार होती. तसे वेळापत्रक जाहिरसुद्धा झाले. मात्र, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद वर्ग 3 व 4 च्या भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या 700 जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदासाठी भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. विशेषत: ग्रामसेवक या पदासाठी न्यायालयात गेले होते. हा विषय न्यायालयाने निकाली काढत भरती करण्याचे आदेश दिले. परंतु त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही भरती प्रक्रिया अडकली. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता ही भरती प्रक्रिया होणार होती.

जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या 18 पदांच्या 715 जागांसाठी 70 हजार 608 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल 41 हजार अर्ज दाखल झाले होते. 3 ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू झाली होती. जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी मुदतीअखेर 70 हजार 608 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आरोग्य सेवक दोन पदांसाठी 64 अर्ज आले आहेत. आरोग्य परिचारीकांच्या भरतीसाठी 227 जागांसाठी 932 अर्ज आले आहेत. तर आरोग्य सेवक 22 जागांसाठी 4 हजार 815 अर्ज प्राप्त झाले आहेत. आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या 52 जागांसाठी 1 हजार 50 अर्ज आले होते. औषध निर्माण अधिकार्‍यांच्या भरतीसाठी 37 जागांसाठी 4 हजार 199 अर्ज प्राप्त झाले होते. विस्तार अधिकारी सांख्खिकी 3 जागांसाठी 564 अर्ज, विस्तार अधिकारी कृषी 4 जागांसाठी 811 अर्ज आले आहेत. वरिष्ठ सहाय्यक लिपिक 1 जागेसाठी 299 अर्ज आले होते. पशुधन पर्यवेक्षक 42 जागांसाठी 1 हजार 286 अर्ज प्राप्त झाले आहेत. कनिष्ठ आरेखक 2 जागांसाठी 61 अर्ज आले आहेत. वरिष्ठ सहाय्यक लिपिक 68 जागांसाठी 11 हजार 41 अर्ज तर पर्यवेक्षिका 9 जागांसाठी 1 हजार 548 अर्ज प्राप्त झाले होते. कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा 31 जागांसाठी 1 हजार 557 अर्ज आले होते. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 22 जागांसाठी 744 अर्ज आले होते. लघुलेखक उच्चश्रेणी 1 जागेसाठी 117 अर्ज दाखल झाले होते.

ग्रामसेवक पद सोडून इतर पदांसाठी 3 ते 11 ऑक्टोबर 2023 या दरम्यान परीक्षा झाली होती. फक्त ग्रामसेवक, आरोग्य सेवक लेखी परीक्षा राहिली होती. आता ही परीक्षा 10 जूननंतर होणार होती. तसे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. आता मात्र कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान होणार असून 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. यानंतरच आचारसंहिता संपणार आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.