कारची पेवर मशीनसह कामगाराला ठोकर; मोटार चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मोटार निष्काळजीपणे चालवून कामगार व चौपदरीकरणाच्या पेवर मशीनला ठोकर देऊन अपघात केला. संशयित मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश उर्फ बाळा अनंत देसाई (रा. हातखंबा, रत्नागिरी) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना २५ मे रात्री दोनच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा तारवेवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जयंतीलाल घेवरचंद नानेचा (वय ५२, रा. इगल इन्फ्रा इंडिया लि.कंपनी मराठेवाडी-पाली,रत्नागिरी) यांच्या इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनी मार्फत हातखंबा येथील हायवे रोडचे चौपदरी करणाचे काम सुरु आहे. त्याठिकाणी सिमेंट क्रॉक्रीट करणारे पेवर मशीनद्वारे कामगार काम करत असताना संशयिताने मोटार (क्र. एमएच-४३ एएल ३७९५) ही निवळी ते हातखंबा असा जात असताना निष्काळजीपणे चालवून चौपदरीकरणाचे काम चालू असलेल्या पेवर मशिनला तसेच तेथे काम करणाऱा कामगार हसन विक्रम सुवर्णकार (४२, रा. हांसा अररिया, रानिगंज, बिहार. सध्या मराठेवाडी, पाली) याला ठोकरुन अपघात केला. या प्रकरणी नानेचा यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.