लोकसभेला उभ्या नऊपैकी सात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक अनेक राजकीय नेत्यांना धक्का देणारी ठरली. या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ४७ हजार मतांनी विनायक राऊत यांचा पराभव केला. निवडणूक रिंगणात असलेल्या उर्वरित सात उमेदवारांवर मात्र अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे.

कोकणातील चोखंदळ मतदारांनी मतदान करताना भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्षाला भरभरून मतदान दिल्याचे झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदारांनी निर्धास्तपणे मतदान केले. लोकसभेच्या या निवडणूक रिंगणात एकूण ९ उमेदवार होते. त्यापैकी ७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे.

नारायण राणे आणि विनायक राऊत हे दोन उमेदवार सोडले तर इतर ७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली जाईल. विनायक लहू राऊत यांना १५ हजार ७६९ मते मिळाली, मारूती जोशी यांना ९ हजार ८७३, राजेंद्र आयरेंना ७ हजार ८५६, अशोक पवार- ५ हजार २४४, सुरेश शिंदे- २ हजार २०९, अनंत तांबे – ५ हजार ५६३ अशी मते मिळाली. त्यामध्ये विनायक लहू राऊत यांनी लक्षवेधी मते घेतली तसेच नोटाला ११ हजार ५१६ मते पडली आहेत.

एकूण वैध मते ९ लाख २ हजार ३९५ आहेत. या वैध मतांच्या १/६ मते न मिळाल्याने सातजणांची प्रत्येकी २५ हजाराची अनामत जप्त होणार आहे. १ लाख ७५ हजार शासनदरबारी जमा होणार आहेत. निवडणूक विभागाने याला दुजोरा दिला.