ज्येष्ठ मच्छीमार नेते आप्पा वांदरकर यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरी रत्नागिरीतील ज्येष्ठ मच्छीमार नेते आणि शहरानजीकच्या भाटिमिऱ्या गावचे सुपुत्र शांताराम उर्फ आप्पा बांदरकर यांचे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.

बुधवार ६ मे रोजी त्यांची प्रकृती अचानक अत्यवस्थ बनल्याने त्यांना रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना आप्पा यांची गुरूवारी सायंकाळी प्राणज्योत मालवली. शांताराम लक्ष्मण उर्फ आप्पा वांदरकर यांना समाजात मोठा मान होता. त्यांनी पारंपरिक मच्छीमारांसाठी अविरत लढा सुरू ठेवलेला होता.

मच्छीमारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधा त सातत्याने ते पुढे राहत असत. पर्ससिन नेटधारक मच्छीमारांच्या समुद्रात होणाऱ्या दादागिरीवर त्यांनी सातत्याने शासन, प्रशासन दरबारी आवाज उठवला होता. त्यामुळे संपूर्ण कोकणातील मच्छीमारांमध्ये त्यांचे नाव अग्रणी घेतले जात असे.

येथील मिऱ्या गावच्या किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी त्यांनी शासनाकडे, येथील प्रशासनाकडे मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. आप्पा यांनी भाटिमिऱ्या गावचे माजी उपसरपंच पदही भूषविले होते.

भंडारी समाजातील मितभाषी आणि वेळप्रसंगी करारी भाषेत बोलणे हा त्यांचा स्वभाव होता. आप्पा यांनी येथील अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी हिरहिरीने काम केले.

त्यांच्या निधनाबद्दल रत्नागिरी शहरातील जनतेतून तसेच मिऱ्या, जाकिमिऱ्या, मुरुगवाडा, मांडवी आदी परिसरातून दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ-भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.