कापडगाव येथे टेम्पो पुलावरून कोसळून तिघे जखमी

रत्नागिरी:- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर एक टेम्पो पालीजवळील कापडगाव (ता. रत्नागिरी) येथील काजवी पुलावरून २० फूट खाली कोसळून त्यात बसलेले तिघे जखमी झाले.

आज दुपारी बारा वाजता हा अपघात झाला. टेम्पो चालक ज्योतिबा सखाराम पेजे (वय. ४८) रा. कापडगाव, हा आपल्या ताब्यातील टाटा टेम्पो क्रमांक एमएव्ह ०८-एपी ५६३३ घेऊन पाली ते कापडगाव असा चालला होता. तो कापडगाव येथील काजवीपूल येथे आला असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन चौपदरीकरणासाठी चालू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी सुमारे २० फूट खोल पडून हा अपघात झाला आहे.

या अपघातामध्ये टेम्पोमध्ये बसून प्रवास करणारे तिघे जखमी झाले. १) विवेक महादेव पेजे (वय ५०) यास उजव्या हाताला फॅक्चर होऊन गंभीर दुखापत झालेली आहे. २) इशा रामचंद्र पेजे (वय 32) ३) कविता किशोर नागले (वय ४५) वर्ष यास किरकोळ दुखापत झालेली आहे. सर्व जखमी कापडगाव येथील आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ स्टाफसह अपघात ठिकाणी भेट दिली. जखमींना उपचारेकरिता जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय पाली येथे नेले. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू आहे. या अपघाताबाबत पाली पोलीस दूरक्षेत्र येथील पोलिसांना कळविण्यात आलेले आहे.