उक्षी येथे टॅंकरचा अपघात होऊन रस्ता बंद

रत्नागिरी:- करबुडे उक्षी मार्गावर गॅस वाहू टँकर घाटात अडकल्याने दोन्ही बाजूची वाहने अडकून पडली आहेत. रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या गॅस वाहू टँकर चालकाला अवघड वळणांचा अंदाज न आल्याने टँकरवरील ताबा सुटला. टँकर रस्ता सोडून बाहेर गेला. मात्र सुदैवाने चालकाने ब्रेक लावल्याने थांबला. अन्यथा खोल दरीत कोसळून स्फोट झाला असता असे येथील मदत करणाऱ्यांनी सांगितले.

हा टँकर लांबीला जास्त असल्याने अवघड वळणावर अगदी मधोमध उभा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे उक्षी- वांद्री संगमेश्वरकडे जाणारी आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतूक काही काळ बंद आहे. ही घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. नवशिका टँकर चालक गुगल मॅप द्वारे संगमेशरला जात असताना ही घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच उक्षी गावचे तंटामुक्त अध्यक्ष संदेश जोशी, पोलीस पाटील अनिल जाधव, मुझम्मील काझी इत्यादींनी घाव घेत मदत कार्य सुरू केले.