रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघावर भाजपचा झेंडा; नारायण राणे ४७ हजार ८५८ मतांनी विजयी

रत्नागिरी:- अठराव्या लोकसभेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तब्बल चार दशकांनंतर भाजपचे कमळ फुलले आहे. महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांनी महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार विनायक भाऊराव राऊत यांचा 47,858 मतांनी पराभव करून विजय संपादन केला आहे. ना.राणे यांना तब्बल 4 लाख 85 हजार 514  मते मिळाली तर खासदार विनायक राऊत यांना 4 लाख 656 मतांवर समाधान मानावे लागले. ना. राणे  यांचा विजय झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केल्यानंतर भाजपासहीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दि.7 मे रोजी मतदान झाले होते. मंगळवार दि.4 जून रोजी सकाळी 7 वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. पहिल्या फेरीत खासदार विनायक राऊत यांनी 462 मतांची आघाडी घेतली होती. त्यावेळी ना.नारायण राणे यांना 17,009 तर विनायक राऊत यांना 17,471 मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खा.राऊत यांची आघाडी मोडीत काढीत 2,305 मतांची आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीतही ना.राणे 30 मताने आघाडीवर राहीले.

चौथ्या फेरीत ना. राणे यांनी मुसंडी मारत पुन्हा 1,724 मतांची आघाडी घेत मुसंडी कायम ठेवली. पाचव्या फेरीत तब्बल 4,239 मतांची आघाडी ना.राणे यांनी कायम ठेवली. येथून ना.राणे यांचा विजयाचा मार्ग अधिकच सुकर होत गेला. सहाव्या फेरीत ना.राणे यांनी 7,818 मतांची आघाडी घेत ते सातव्या फेरीकडे वळले. सातव्या फेरीत आघाडी कायम राखत ना.राणे यांनी 9,779 मते मिळवून वरचढ राहण्यात यश मिळवले.

पहिल्या सात फेऱ्यांमध्ये ना.राणे हे सलग आघाडीवर राहिल्यानंतर भाजपासहीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला होता. याच दरम्यान झालेल्या आठव्या फेरीत पुन्हा ना.राणे यांनी 14,241 मतांची आघाडी घेतली. नवव्या फेरीत आघाडी कायम राखत ना.राणे यांचे मताधिक्क्य 17,007 मतांवर पोहोचले होते. दहाव्या फेरीत ना.राणे यांच्या मताधिक्क्यात वाढ होऊन ते 18,949 झाले. ना.राणे हे 20,000 मताधिक्क्याच्या आसपास पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. अकराव्या फेरीत ना.राणे यांना 20,847 चे मताधिक्क्य मिळाले. या पूर्वीच्या फेऱ्यांमध्ये ना. राणे कायम आघाडीवर राहिल्याने 20 हजारचे मताधिक्क्य खा.राऊत कमी करणे शक्य नसल्याची खात्री झाल्यानंतर ना.राणे यांनीही आपलाच विजय निश्चित असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

बाराव्या फेरीत ना.राणे यांचे मताधिक्क्य 23,450 वर पोहोचले. तर तेराव्या फेरीत त्यांच्या मताधिक्क्यामध्ये मोठी वाढ होत ते 26,934 झाले. सलग 12 फेऱ्यांमध्ये ना.राणे यांच्या मताधिक्क्याचा आलेख वाढतच राहिला होता. चौदाव्या फेरीत त्यांचे मताधिक्क्य 27,259 झाले. तर पंधराव्या फेरीत ना.राणे यांना तब्बल 2,88,952 मते मिळाली. तर खा.राऊत 2,54,157 वर थांबले होते. त्यामुळे ना.राणे यांना 34,795 चे मताधिक्क्य मिळाले. सोळाव्या फेरीत ना.राणे यांच्या मताधिक्क्यात पुन्हा वाढ होत ते 38,958 वर पोहोचले. 17व्या फेरीत ना.राणे यांनी 40 हजाराचे मताधिक्क्य पार करत ते 41,221 वर पोहोचले. 40 हजारांचे मताधिक्क्य पार केल्यामुळे ना.राणे यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झाले होते. 18व्या फेरीत ना.राणे यांचे मताधिक्क्य पुन्हा 45,132 वर पोहोचले. 19व्या फेरीत ना.राणे 48,640 मताधिक्क्य घेऊन आघाडीवर राहिले. 20व्या फेरीत ना.राणे यांनी 49,199 चे मताधिक्क्य घेतले. त्यामुळे 21व्या फेरीत ना.राणे 50 हजारांचे मताधिक्क्य पार करतील असे असताना 21व्या फेरीत ना.राणे 49,461 मतांनी आघाडीवर राहिले. 22व्या फेरीत ना.राणे यांनी 50 हजाराचा टप्पा पार करत 51,399 चे मताधिक्क्य मिळवले. 23व्या फेरीत ना.राणे यांना 51,894 चे मताधिक्क्य मिळाले. 24व्या फेरीत ना.राणे यांच्या मताधिक्क्यात घट होत ते पुन्हा 50,014 वर आले. अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये सिंधुदुर्गतील एक व रत्नागिरी तीन विधानसभा मतदारसंघ असल्याने ना.राणे यांना बसला. अखेरच्या फेरीत पुन्हा एकदा ना.राणे यांच्या मताधिक्क्यात घट होऊन ते 47,858 वर येऊन थांबले. अखेरच्या फेरीपर्यंत ना.राणे यांना 4,48,514 मते मिळाली तर खा.राऊत यांना 4,00,656 मते मिळाली. ना.राणे यांना 3,175 तर खा.राऊत यांना 4,132 टपाली मते मिळाली आहेत.

सायंकाळी 5.30 वाजता मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ना.राणे यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत जीवन देसाई, जगदिश काटकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्योगमंत्र्यांच्या मतदारसंघात ‘महाविकास’ला ‘आघाडी’
महायुतीचे नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार खा.विनायक राऊत यांनाच मताधिक्क्य मिळाले आहे. याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे उबाठा पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात ना.राणे यांना मताधिक्क्य मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचे काय परिणाम होतात, याची चर्चा महायुतीसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे सुरू होती.

उमेदवारांनी मिळालेली मते
राजेंद्र आयरे 7,856
नारायणराव राणे 4,48,514
विनायक राऊत 4,00,656
अशोक पवार 5,280
मारूती जोशी 10,039
सुरेश शिंदे 2,247
अमृत तांबडे 5,582
विनायक राऊत 15,826
शकील सावंत 6,395
नाकारलेली मते 1,545
नोटा 11,643

ना.रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन यांच्यामुळे नारायण राणे यांचा विजय
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण, त्यांचे स्वीय सहाय्यक श्री.अनिकेत पटवर्धन यांनी स्वीकारली होती. या दोघांनी यशस्वीपणे राजकीय समिकरणे मांडून तब्बल 47 वर्षानंतर भाजपच्या तिकिटावर ना.नारायण राणे यांचा विजय निश्चित केला आहे. सन 1977 च्या आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनसंघाच्या ॲड.बापुसाहेब परूळेकर यांनी काँग्रेसचे उमेदवार शामराव पेजे यांचा 25,300 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर तब्बल 47 वर्षानंतर नारायण राणे यांच्या रूपाने भाजपाचा अधिकृत उमेदवार मतदारसंघातून निवडून आले आहेत. 15 वर्षानंतर श्री.राणे यांच्या कुटुंबातील सदस्य लोकसभेत निवडून आला आहे.

धनशक्तीचा विजय: विनायक राऊत
लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला हे आपण मान्य केले आहे. परंतु हा आपला पराभव नसून धनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया मावळते खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. स्लिपा वाटतानाच सिंधुदुर्गात पैशाचे वाटप होत होते. त्यानंतर या मतदारसंघात पैशाचा पाऊस पडला,त्याचेच निकालात रूपांतर झाल्याचे दिसत आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदासंघात अपेक्षेपेक्षा कमी मतदान मिळाल्याची खंत श्री.राऊत यांनी व्यक्त केली.परंतु महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे आपल्याला ना.राणे यांच्याशी कडवी लढत देता आली असेही श्री.राऊत यांनी सांगितले.