नारायण राणे की विनायक राऊत! आज फैसला

रत्नागिरी:- मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात आज दि.4 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे, विद्यमान खासदार श्री.विनायक राऊत यांच्या राजकीय नशिबाचा फैसला आज होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

ना.राणे, श्री.राऊत यांचे असंख्य समर्थक सोमवारी सायंकाळी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. रत्नागिरी शहर परिसरातील सर्व हॉटेल्सचे आरक्षण फुल झाले आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यास परवानगी नसली तरी फटाके मोठ्या प्रमाणात रत्नागिरीत आणण्यात आले आहेत. सदरचे फटाके कोण वाजणार? याबाबतची उत्सुकता कायम आहे.

दि.7 मे रोजी 4,48,513 महिला, 4,59,105 पुरूष असे एकूण 9,07,618 मतदान झाले. सुविधा मतदान 8,577, टपाली मतदान 313, सैनिक मतदान 405, इतर मतदान 60 असे एकूण 9355 मतदान झाले आहेत. आज सकाळी पहिल्यांदा टपाली मतदान मोजण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी 1158 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सोमवारी त्यांना अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. चिपळूण विधानसभा मतदारसंघात 24 फेऱ्या, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 25 फेऱ्या, राजापुरात 25 फेऱ्या, कणकवली विधानसभा मतदारसंघात 25 फेऱ्या, कुडाळमध्ये 20 फेऱ्या, सावंतवाडीत 22 फेऱ्या होणार आहेत. एकाच वेळी 14 टेबलांवर 60 हजार मतांची मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीची फेरी पूर्ण झाल्यानंतर ध्वनीक्षेपकावर उमेदवारांना मिळालेल्या आकडेवारीचा तपशील जाहीर केला जाणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 9 उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्षात ना.नारायणराव राणे, खा.श्री.विनायक राऊत यांच्यातच खरी लढत होणार आहे.

मतमोजणीसाठी आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी गोदामासमोरच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी वाहन पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी नेमलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी शासनाने अधिकृत ओळखपत्र दिलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, निवडणुकीत उभे असलेले उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. विनायक राऊत यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना यश हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी कोकण रेल्वे कार्यालयासमोरील जीएफ कंपनीच्या मोकळ्या जागेत वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी श्री सिद्धीविनायक सर्व्हिसेस समोरील मोकळी जागा पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मतमोजणी केंद्रासमोरील रस्त्याच्या पलिकडे असलेल्या मोकळ्या जागेत वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी याच जागांमध्ये आपली वाहने उभी करून ठेवावयाची आहे. मतमोजणी केंद्राबाहेर आज पहाटेपासून पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. ना.नारायणराव राणे, श्री.विनायक राऊत यांच्यापैकी कोण विजयी होतो याकडे असंख्य मतदारांचे लक्ष लागले आहे.