पुढील काही दिवस जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळणार

रत्नागिरी:-  रेमल चक्रिवादळाच्या प्रभावाने बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाची वाटचाल अत्यंत वेगाने सुरू झाली आहे. अरबी सागरातही मोसमीपाऊस प्रभावीपणे सक्रीय होण्यास आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. त्यामुळे मोसमी पावसाचा तळकोकणातील मार्गही सुकर झाला असून, त्याच्या प्रभावाने येत्या दोन तीन दिवसात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभगाने वर्तविली आहे.

मोसमीच्या वेगवान हालचालींनी तळकोकणातील प्रवेशाचा मुहुर्त दोन ते तीन दिवसाने लवकर होण्याचा अंदाज हवामान विभागाने चालू हवमानाच्या प्रारुप आराखड्यात वर्तविला आहे. या आधी 7 ते 8 जूनपर्यंत तळकोकणात मोसमी पाऊस धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल होता. नव्या अंदाजानुसार दि. 4 जूनपर्यंत मोसमी पाऊस कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, अल निनोच्या प्रभावाने या सरीत येणार्‍या विघ्नांचा अंदाज घेता कोकणातील सर्व जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मोसमी पाऊस तळकोकणाच्या उंबरठ्यावर येण्याआधी तापामानात वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यात 33 ते 35 तर पालघर जिल्ह्यात 35 ते 36, रायगडात 34 ते 35.5 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 32 ते 34 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.