कशेडी बोगद्यातील अवजड वाहतुक अखेर बंद

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यातून होणाऱ्या अवजड वाहतुकीच्या वाहनांमुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडत होता. या अवजड वाहतुकीच्या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा मजबूत ‘हाईट खांब’ उभारले. यामुळे अवजड वाहतुकीला अखेर ब्रेक लागला आहे.

बहुचर्चित कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर केवळ हलक्या वजनांच्या वाहनांकरिता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाला होता. मात्र बोगद्यातून अवजड वाहनांची दुतर्फा वाहतूकही सुरू होती. यामुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडून वादाचे प्रसंग देखील घडत होते. अवजड वाहतूक नियंत्रित करताना कशेडीतील महामार्ग वाहतूक पोलिसांची कसरत सुरू होती.

यामुळे बोगद्यातील अवजड वाहतुकीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी हाईट खांबचा अवलंब करण्यात आला. मात्र हे हाईट खांब अवजड वाहतुकीच्या वाहनचालकांनी अवघ्या दोन दिवसातच उखडले होते. अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने आणखी

मजबूत हाईट खांबची उभारणी करण्याचा निर्णय घेत शुक्रवारपासून प्रत्यक्षात कार्यवाही देखील सुरू केली आहे. तालुक्यातील खवटी येथील अनुसया हॉटेलनजीक व पोलादपूर हद्दीतील भोगाव येथे मजबूत हाईट खांब उभारण्यात आले आहेत. याशिवाय दोन्ही बाजुला अवजड बॅरिगेटस्ही लावले आहेत. यामुळे कशेडी बोगद्यातून दुतर्फा अवजड वाहतूक रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याला यश आले आहे.

कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतुकीसाठी केवळ हलक्या वजनाच्या वाहनांनाच मुभा देण्यात आली आहे. बोगद्यातून अवजड वाहतुकीच्या वाहनांनी मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात कशेडी येथील वाहतूक पोलिसांना सूचित केले जाणार आहे, अशी व माहिती, राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.