रत्नागिरी:- रत्नागिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीसाठी २५० कोटी रुपये मंजूर आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून ७५० विद्यार्थ्यांना शिक्षण
घेता येणार आहे. १५ ऑगस्टला त्याचे उद्गाटन होणार आहे. लोकनेते शामराव पेजे अभियंत्रिकी महाविद्यालय या नावाने हे महाविद्यालय ओळखले जाईल. त्यामुळे कुणबी समाज बांधवांची मागणी पुर्ण होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शीळ जॅकवेलवर नवीन ड्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथील हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले, शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्षा भेटी देऊन पाहणी केली. शहराच्या खालच्या भागात होणाऱ्या ८ कोटीच्या जलतरण तलावाची पाहणी केली. १०५ कोटीच्या पोलिस गृहनिर्माण वसाहतीच्या कामाची पाहणी केली. १५
कोटीच्या शासकीय ग्रंथालयाच्या कामाची पाहणी केली. थ्रीडी शोच्या २० कोटीच्या कामाची पाहणी केली. रहाटाघर बसस्थानकाच्या ५ कोटीच्या कामाचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या ५ कोटीच्या कामाची माहिती घेतली.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या २० कोटीच्या कामाचाही आढावा घेतला. तसचे प्राणी संग्रहालयाच्या कामही जोरात सुरू आहे. मी विकासाबाबत जनतेला दिलेला शब्द पाळला आहे. अनेक कामांचा १५ ऑगस्टला लोकार्पण सोहळा होणार आहे.
माजी क्रिकेट पट्टु प्रविण आंब्रे यांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे मराठीत प्रकाशन करण्यात
येणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या या कार्यक्रमाला भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव, तसेच विद्यमान कर्णधार रोहित शर्मा येण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २० विद्यार्थी अमेरिकेतील नासा संस्थेला भेट देणार
आहेत. त्याबाबतचे सर्व प्रशिक्षण मुलांना देण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधुन नाविन्यपुर्ण हेटअंतर्गत निधी देणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील पहिला आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्हा नियोजन समितीचा ३६० कोटीचा विकास आराखडा मंजूर आहे. परंतु आचारसंहितेमुळे त्या कामांना काहीसा अडथळा आला होता. हा निधी नियोजन करून लवकरात लवकर खर्च करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.
शीळ धऱण येथे जुन्या ट्रान्सफॉर्मरमध्ये काहीतरी तांत्रिक दोष होण्याची भिती आहे. त्यामुळे दक्षता म्हणून दीड लाख मंजूर करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.