जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त

कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांची लेखी परीक्षा 10 जुननंतर

रत्नागिरी:- गेले अनेक महिने अडकलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांची लेखी परीक्षा 10 जूननंतर होणार असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले आहे. कंत्राटी ग्रामसेवकाच्या 185 जागेसाठी तब्बल 41 हजार 145 अर्ज दाखल झाले आहेत.

जि.प.वर्ग 3 व 4 च्या भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या 700 जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदासाठी भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. विशेषत: ग्रामसेवक या पदासाठी न्यायालयात गेले होते. हा विषय न्यायालयाने निकाली काढत भरती करण्याचे आदेश दिले. परंतु त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही भरती प्रक्रिया अडकली. निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता ही भरती प्रक्रिया होणार आहे.

जि.प.जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या 18 पदांच्या 715 जागांसाठी 70 हजार 608 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज म्हणजे तब्बल 41 हजार अर्ज दाखल झाले होते. 3 ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू झाली होती. फक्त ग्रामसेवक पदासाठी अजूनही परीक्षा निश्चित झालेली नाही.

जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी मुदतीअखेर 70 हजार 608 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आरोग्य सेवक दोन पदांसाठी 64 हर्ज आले आहेत. आरोग्य परिचारीकांच्या भरतीसाठी 227 जागांसाठी 932 अर्ज आले आहेत. तर आरोग्य सेवक 22 जागांसाठी 4 हजार 815 अर्ज प्राप्त झाले आहेत. आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या 52 जागांसाठी 1 हजार 50 अर्ज आले होते. औषध निर्माण अधिकार्‍यांच्या भरतीसाठी 37 जागांसाठी 4 हजार 199 अर्ज प्राप्त झाले होते तर विस्तार अधिकारी सांख्यिकी 3 जागांसाठी 564 अर्ज, विस्तार अधिकारी कृषी 4 जागांसाठी 811 अर्ज आले
आहेत.

वरिष्ठ सहाय्यक लिपिक 1 जागेसाठी 299 अर्ज आले होते. पशुधन पर्यवेक्षक 42 जागांसाठी 1 हजार 286 अर्ज प्राप्त झाले आहेत. कनिष्ठ आरेखक 2 जागांसाठी 61 अर्ज आले आहेत. राज्यातील भरती संदर्भात आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या भरतीसाठी घेण्यात येणारे शुल्क कमी करण्याची मागणी त्यांनी केली होती. एकट्या रत्नागिरी जिल्हा परिषदकडे भरती प्रक्रियेसाठी तब्बल 6 कोटी रुपये आले आहेत. मात्र हे सर्व पैसे खासगी कंपनीकडे वर्ग करण्यात येणार आहेत.