किमान वेतनासाठी अंशकालीन महिला परिचरचा जि. प. वर मोर्चा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद महिला परिचर महासंघातर्फे अंशकालीन महिलांना किमान वेतन मिळावे, तसेच अंशकालीन नावात बदल करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे.

जि. प. चे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा आकांशा कांबळे उपस्थित होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात अंशकालीन महिला परिचर सेवेत असून फक्त 3 हजार रु. मानधनावर काम करत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत असून त्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे. त्यामुळे किमान 21 हजार रुपये मानधन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रमुख मागणीबरोबरच अंशकालीन नावात बदल करण्यात यावा. दरवर्षी गणवेश मिळावा, दरवर्षी भाऊबीज किमान 2 हजार रु. मिळावी, अपघात विमा योजनेचा लाभ द्यावा, मानधन 1 तारखेला करावे, अशी मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.