शिरगाव येथे शॉक लागून तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरालगतच्या शिरगाव येथे शॉक लागून तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दिनांक २५ मे २०२४ रोजी सकाळच्या सुमारास घडली. अश्विनी सनगरे (27, शिरगाव, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, अश्विनी हीने शनिवारी सकाळी कंपनीतून कामावरून आल्यानंतर वॉशिंग मशिनला कपडे लावले होते. थोड्या वेळाने हे लावलेले कपडे काढण्यासाठी वॉशिंग मशीन जवळ गेली. यावेळी तिने बटण बंद न करताच वॉशिंग मशीनमध्ये हात घातला. मात्र मशीनमध्ये पाणी असल्याने विजेचा जोरदार धक्का तिला बसला. ती तिथेच खाली पडली. बऱ्याच वेळानंतर शेजारच्या व्यक्तीने तिला पाहिल्यानंतर ती निपचित पडलेली दिसून आली. शेजाऱ्यांनी तिला प्रथम खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.