१ हजार ५३८ महसुली गावे पब्लिक अलर्ट सिस्टमने जोडणार

जिल्हाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्याकडे प्रस्ताव

रत्नागिरी:- गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आपत्ती व्यवस्थापनामध्ये जिल्हा प्रशासन अधिक सजक आणि मजबूत झाले आहे. म्हणून आपत्तीबाबत तत्काळ माहिती मिळण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ५३८ महसुली गावे पब्लिक अलर्ट सिस्टम या यंत्रणेने जोडण्याचा प्रस्ताव पालकमंत्री ना.उदय सामंत यांना दिला आहे. जिल्हा नियोजनमधुन त्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. आपत्तीच्यादृष्टीने जिल्ह्यातील शहरे देखील सीसी टिव्हीने जोण्याचा नवा प्रस्ताव आहे. त्याचे नियंत्रण कक्ष पोलिस नियंत्रण कक्षात ठेवण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी किर्तीकीरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, आपत्ती व्यवस्थापनचे अजय सुर्यवंशी, महावितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत हवामान खराब असल्याने यावेळी उपस्थित राहु शकले नाही. ते ऑनलाईन या मिटिंगला होते.

यावेळी त्यांनी मिऱ्या‚ नागपूर महामार्ग पावसामुळे माती रस्त्यावर येऊन निसरडा झाल्याने धोकादायक झाला आहे, शहरातील गटालांची स्वच्छता, मिर्या बंधाऱ्याचे उर्वरित टप्पा, मध्यवर्ती एसटी बस स्थानकाचे काम, शहरातील पाणी प्रश्न, वाशिष्टीच्या गाळाचा प्रश्न आदीची प्रत्यक्ष भेटी देऊन योग्य ते उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले.

श्री. सिंह म्हणले, पालकमंत्री सामंत यांनी आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेतील. त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार आम्ही प्रत्यक्ष भेटी देऊन त्यावर तोडगा काढणार आहे. ठेकेदारांसह संबंधित यंत्रणाच्या अधिकाऱ्याला सोबत घेणार आहे. पावसाळ्यात काही गंभीर समस्या निर्माण होऊ, नयेत यासाठी मिऱ्या‚नागपूर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. ठेकेदार रवी इन्फ्रा, म्हात्रे यांच्याशी बैठक घेऊन त्यांना ताकीद दिली जाणार आहे.

चिखल होणाऱ्या ठिकाणी तत्काळ उपाय काढण्याचे आदेश दिले जाती. शहरातील गटालांची स्वच्छता झाली आहे का, काँक्रिटीकरणामुळे जे काही प्रश्न निर्माण होणार आहेत, त्याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत. शीळ धरणातील पाण्याचा आढावा घेतला आहे. मिऱ्या बंधाऱ्याचे एक टप्पा राहिला आहे, त्याला भेट देऊन पत्तन विभागाला आदेश दिले जातील. महावितरणची दिवसातून दोन वेळा आढावा बैठक घेतली जाईल, दापोली, राजापूर‚खेड, चिपळूण, रत्नागिरी अशा आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. पालकमंत्र्याच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन ॲक्टीव्ह मोडमध्ये आले असून प्रत्यक्ष भेटी देऊन या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

दोन्ही नद्यातील १५.२ लाख घनमिटर गाळ काढला
चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदीतील १० लाख ९४ हजार २४३ घनमीटर एवढा गाळ काढला आहे. तर नाम फाऊंडेशनने शिवनदीतील ४ लाख २६ हजार २२१ घनमीटर गाळ काढला आहे. एकुण १५.२ लाख घनमिटर गाळ काढण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दिली.