करबुडे फाटा ते वेतोशी मार्गावर रिक्षा अपघातात चालक ठार

रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे फाटा ते वेतोशी जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

निलेश दत्ताराम रेवाळे (वय ३२, रा. रेवाळेवाडी, भोके, रत्नागिरी) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २३) रात्री साडेबाराच्या सुमारास करबुडेफाटा उतारात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निलेश बुधवारी रिक्षा घेऊन करबुडेफाटा ते वेतोशी रस्त्याने जात असताना करबुडेफाटा येथील उतारात त्याच्या रिक्षाचे ब्रेकनिकामी झाल्याने अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. या बाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकित अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.