दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी कार चालकावर गुन्हा

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथे कार व दुचाकी अपघात प्रकरणी कार चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अपघाताची खबर एकनाथ सखाराम बारगुडे (वय- ४० वर्षे, रा. किरडुवे) यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली. योगेश चंद्रकांत टक्के (रा. तळवडे मावळतीवाडी, वय ३२ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. किरडुवे बारगुडेवाडी येथील महेंद्र बारगुडे आपल्या ताब्यातील दुचाकी घेवून देवरूखहून किरडुवेच्या दिशेने जात होते. त्यांच्या दुचाकीवर प्रविण सोमा बारगुडे देखील बसले होते. तळवडे येथील योगेश टक्के हा आपल्या ताब्यातील कार घेवून रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने येत होता. आंबव सुतारवाडी येथे योगेश टक्के याने कार दुचाकीस्वार बारगुडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू बेदरकारपणे चालवून बारगुडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील महेंद्र बारगुडे यांना गंभीर दुखापत झाली. उपचारा दरम्यान बारगुडे यांचा मृत्यु झाला. तसेच प्रविण बारगुडे व योगेश टक्के जखमी झाले आहेत.

महेंद्र बारगुडे यांच्या मृत्युस, दोन्ही वाहनाच्या नुकसानीस, प्रविण बारगुडे व स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालक योगेश टक्के याच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महेंद्र बारगुडे यांच्या पार्थिवावर मंगळवारी किरडुवे येथील स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.