पाणी टंचाईच्या काळात जयस्तंभ येथे हजारो लिटर पाण्याची नासाडी

रत्नागिरी:- शीळ धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने शहराला एकदिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात पाणी टंचाई असताना जयस्तंभ येथे पाईपलाईन फुटल्याने मंगळवारी दुपारी हजारी लिटर पाणी वाया गेले. नगर परिषद इमारती पासून अवघ्या काही अंतरावर ही पाण्याची नासाडी सुरू होती.

जयस्तंभ परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच महिनाभरापूर्वी जलवाहिनी फुटली होती. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापासून जवळच असलेल्या ठिकाणी जलवाहिनी फुटून चिखलमिश्रित पाणी रस्त्यावर पसरले होते. जयस्तंभ परिसरात वारंवार पाईपलाईन फुटत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ही नळपाणी योजना नव्याने झालेली असून त्याची सतत दुरुस्ती कशी केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास जयस्तंभ येथे पुन्हा ही पाइपलाइन फुटली. जवळपास दोन तास अधिक फुटलेल्या पाईप लाईन मधून पाणी वाहत होते. विशेष म्हणजे नगर परिषदेच्या ईमारती पासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार सुरू होता. तरीदेखील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना पोहचण्यासाठी बराचवेळ लागला. तोपर्यंत हजेरी लिटर पाणी वाया गेले. शहरात एक दिवस आड पाणी पुरवठा सुरू असताना पाण्याची होणाऱ्या नासाडी यामुळे नागरिकांनी नगर परिषदेच्या कारभारा विरोधात तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.