नव्या भरतीनंतरही जिल्ह्यात शिक्षकांची ९८६ पदे राहणार रिक्त

तात्पुत्या शिक्षकांना काम बंद करण्याच्या सुचना

रत्नागिरी:- जिल्ह्यात शिक्षकांची २ हजार पदे रिक्त असतानाही केवळ १ हजार ६८ पदांची भरती करण्यात येणार आहे. या शिक्षक भरतीमुळे तात्पुरते भरण्यात आलेल्या सुमारे ७०० शिक्षकांचे काम बंद करण्यात आले आहे.त्यातच नव्याने भरती प्रक्रिया राबविल्यानंतरही शिक्षकांची ९८६ पदे रिक्तच राहणार आहे. त्यामुळे रिक्त पदांचा डोलारा सांभाळत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे आव्हान शिक्षण विभागाला पेलावे लागणार आहे.

गेली १० ते १२ वर्षे नव्याने शिक्षक भरती झालेली नाही. त्यातच निवृत्त होणारे शिक्षक, आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्याही फार मोठी असल्याने दरवर्षी रिक्त पदांचा आलेख वाढत चालला आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ लागला. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणीही पालकांकडून सातत्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे करण्यात येत होती. पण, ही मागणी केवळ ऐकण्यापुरतीच मर्यादित राहत होती.
शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा शासनाला मुहूर्त मिळाला असून, जिल्ह्यात शिक्षकांची १ हजार ६८ पदे भरण्यात येणार आहेत. त्यातही ५४ उमेदवार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे आता केवळ १ हजार १४ पदांची भरती होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांची ९८६ पदे रिक्त राहणार आहेत. ही पदे कधी भरणार, असाही प्रश्न पालकांकडून करण्यात येत आहे.
शिक्षक भरती करण्यात येत असतानाच पूर्वीच्या शिक्षकांच्या तालुका अंतर्गत बदल्या झाल्याशिवाय नवीन शिक्षकांना शाळा देऊ नयेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. त्यामुळे आधी पूर्वीच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.शिक्षक भरतीच प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नवीन भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. निवडणुकीनंतर काही प्रमाणात आचारसंहिता शिथिल करण्यात आली होती. पण, त्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी नव्याने आचारसंहिता लागू करण्यात आली. ही निवडणूक पार पडल्यानंतर दि.१० जूननंतरच शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

शिक्षक भरती सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन भरती होणार् शिक्षकांचे नुकसान झाले. केवU समुपदेशनाद्वारे शाळांवर नियुक्ती देण्याचे काम शिक्षण विभागाकडून शिल्लक राहिले होते. मात्र, निवडणुकीमुळे शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. त्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शनही मागविले होते.

काम बंदच्या सूचना

शिक्षक भरतीची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली असल्याने तात्पुरत्या घेण्यात आलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून काम बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांना येत्या शैक्षणिक वर्षापूर्वीच कमी करण्यात आले. मात्र, त्या शिक्षकांना मुदतवाढ दिली असती तर रिक्त पदांची कसर भरून निघाली असती.