नसबंदी शस्त्रक्रियेकडे पुरुषांची पाठ; वर्षभरात फक्त ५ शस्त्रक्रिया

रत्नागिरी:- नसबंदी केल्यानंतर पौरुषत्व कमी होते, नसबंदी प्रक्रिया धोकादायक आणि वेदनादायक आहे, नसबंदी केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो या चुकीच्या समजुतीमुळे पुरुषांनी नसबंदीकडे पुरती पाठ केली आहे. वर्षभरात अवघ्या ५ पुरुषांनी नसबंदी केल्याचे पुढे आले आहे. २ हजार ९५१ महिलांनी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या आहेत. महिलांच्याच नशिबी या वेदना आल्या आहेत.

पुरुष नसबंदी ही एक झटपट शस्त्रक्रिया आहे. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा ती फारच सोपी आणि सुरक्षित आहे. ही शस्त्रक्रिया स्थानिक भूल देऊन प्राथमिक आरोग्यकेंद्रातही करता येते आणि शस्त्रक्रियेनंतर तासाभरात घरीही जाता येते. असे असले तरी काही चुकीच्या समजातून पुरुष नसबंदीकडे पाठ फिरवितात. २०२३-२४ या कालावधीत केवळ पाचच पुरुषांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली तर दुसरीकडे २ हजार ९५१ महिलांनी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

अनेक गैरसमजामुळे पुरुषमंडळी शस्त्रक्रियेसाठी पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेची संपूर्ण धुरा महिलांच्या खांद्यावर येऊन ठेपत आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही सोपी आणि निर्धोक आहे; मात्र, पुरुषी अहंकारापोटी व अशक्तपणा येत असल्याच्या गैरसमजातून पुरुषमंडळी शस्त्रक्रिया करून घेण्यास टाळाटाळ करतात. पर्यायाने शस्त्रक्रिया करून घेण्याची जबाबदारी महिलांवर येऊन ठेपते. या बाबतीत पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी आरोग्ययंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येत असले तरी त्यास अपेक्षित यश येताना दिसत नाही.