किरण सामंत यांना महाविकास आघाडीचे नेते राज्यसभेच्या माध्यमातून संधी देतील : आ. साळवी

विनायक राऊत हे अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील : राजन साळवी

रत्नागिरी:- किरण सामंत हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत, कोकणात त्यांचं चांगलं काम आहे, समोरच्या पक्षातील चांगल्या नेतृत्वाची देखील दाद दिली पाहिजे. म्हणून असं एक नेतृत्व खासदार म्हणून लोकसभेत जायला पाहिजे असं माझं मत आहे, असं शिवसेना (उबाठा) नेते, आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे. हा लोकसभा मतदारसंघ आमचाच आहे, या मतदारसंघावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचंच वर्चस्व राहणार, त्यामुळे आशा एका नेतृत्वाला महाविकास आघाडीचे नेते राज्यसभेच्या माध्यमातून संधी देतील हा मला विश्वास आहे, असं देखील राजन साळवी यावेळी म्हणाले. राजन साळवी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार विनायक राऊत हे अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही शिवसेना (उबाठा) उपनेते, आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी साळवी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा रोज थोडी-थोडी लयास जात आहे. त्यामुळे देशात आमची इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी वरचढ राहील. राज्यात 45 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी जिंकेल असं राजन साळवी यावेळी म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये मी विजयाचा चौकार मारेन असाही विश्वास राजन साळवी यांनी व्यक्त केला.