राज्यस्तरीय नाट्यगीत स्पर्धेत रत्नागिरीची तन्वी मोरे द्वितीय

मुंबईतील अंतिम फेरीत यश; नाट्य परिषदेकडून ‘जागर नाट्यकलेचाआयोजन

रत्नागिरी:- शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित नाट्यगीत गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या तन्वी मोरेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. माटुंगा-मुंबई येथील यशवंत नाट्यगृहाच्या रंगमंचावर पार पडलेली ही अंतिम फेरी राज्यभरातील २१ स्पर्धकांमध्ये पार पडली.

शतकमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रभर नाट्यकलेचा जागर या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यपद गायन, नाट्यछटा आणि नाट्य अभिवाचन अशा विभिन्न सहा स्पर्धांचा समावेश होता. नाट्यगीत गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यभरातील एकूण २२ केंद्रांवर पार पडली होती. रत्नागिरी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची मिळून प्राथमिक फेरी रत्नागिरीत येथे पार पडली. या केंद्रातून तन्वी मंगेश मोरे हिची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. काल (ता. ६) रोजी मुंबई-माटुंगा येथे अंतिम फेरी पार पडली. राज्यभरातील २१ स्पर्धकांमध्ये ही फेरी अत्यंत चुरशीची झाली. तन्वीने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून रत्नागिरीची मोहोर उमटवली. अंतिम फेरीकरिता ज्ञानेश पेंढारकर, शुभदा दादरकर आणि मधुवंती दांडेकर या ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध रंगकर्मी गायक कलाकारांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी सिनेकलाकार आणि नाट्यपरिषदेचे पदाधिकारी विजय गोखले, सविता मालपेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नाट्यगीत गायन स्पर्धेतील विजेत्या कलाकारांचा एक कार्यक्रम मुंबईत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी परीक्षक शुभदा दादरकर यांनी दिले. स्पर्धेत तन्वीसोबत सार्थक बाविकर (कोल्हापूर), रिदम पाटील (लातूर), ओंकार पाटील (कोल्हापूर), वेद मुळे (बीड), तनय नाझीरकर (पुणे), राधा ठेंगडी (नागपूर), विकास चव्हाण (अहमदनगर) यांनी यश संपादन केले.
तन्वी यशाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे समीर इंदुलकर यांनी तसेच तिच्या गुरू विनया परब यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.