नारायण राणे – विनायक राऊतांचे भवितव्य मतपेटीत बंद

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी सरासरी ६४ टक्के मतदान, ४ जूनला फैसला

रत्नागिरी:- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदार संघातील मुख्य लढत असलेल्या नारायण राणे आणि विनायक राऊत यांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले. मतदानाचा कौल ४ जूनला उघड होणार आहे. मंगळवारी सकाळी पहिल्या दोन तासात मतदानासाठी मतदारांचा थोडा संथ प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर मतदार राजाने मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. सायंकाळी चार वाजल्या नंतर तर अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पाच वाजता जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ५८ टक्के मतदान झाले. अखेरच्या एका तासात ही आकडेवारी वाढून सरासरी ६४ टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राणे विरुद्ध राऊत मुख्य लढत

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांना संधी देण्यात आली आहे. महायुतीकडून भाजपने या मतदार संघातून विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नऊ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही विद्यमान खासदार विनायक राऊत विरुद्ध महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यातच रंगणार असल्याचे चित्र आहे. या मतदार संघात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष पाहायला मिळाला. प्रचाराच्या काळात दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. जाहीर सभा, स्टार प्रचारकानी या मतदारसंघात हजेरी लावली. मात्र, राणे विरुद्ध राऊत लढतीमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली.

सकाळी नऊ वाजेपर्यंत ८.१७ टक्के मतदान

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदानाच्या पहिल्या दोन तासात सकाळी ७ ते ९ या वेळेत केवळ ८.१७ टक्केच मतदान झाले. सकाळी शहरी भागात मतदानाची मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. सकाळी सात वाजल्यापासून मतदानासाठी शहरी भागात गर्दी पाहायला मिळाली. मात्र, ग्रामीण भागात मतदानाला संथ प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. पहिल्या दोन तासात केवळ ८.१७ टक्के मतदान झाले. यात चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १०.१३ टक्के, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात केवळ ६ टक्के, राजापूर विधानसभा मतदारसंघात १०.०९ टक्के, कणकवली मतदारसंघात ७ टक्के, कुडाळ ७.४८ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ८.३९ टक्के मतदान झाले.

सकाळी नऊ नंतर मतदानाचा टक्का वाढला

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजल्या नंतर मतदानाचा टक्का वाढला. सकाळी ११ वाजेपर्यंत २१.१९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ८.१७ टक्केच मतदान झाले होते. पुढील दोन तासात तब्बल १३.०२ टक्के मतदान झाले. यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २४.१८ टक्के मतदान झाले. रत्नागिरीत सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत केवळ १५ टक्के मतदान झाले. राजापूर विधानसभा मतदारसंघात २३.६३ टक्के मतदान झाले. कणकवली विधानसभा मतदारसंघात २२.०९ टक्के, कुडाळ मतदारसंघात २१.०४ आणि सावंतवाडी मतदार संघात २१.७४ टक्के मतदान झाले आहे.

११ ते १ या वेळेत १३.७२ टक्के मतदान

मतदानाच्या दुपारी ११ तर १ या वेळेत १३.७२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. दुपारी १ वाजेपर्यंत ३३.९१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१७ टक्के तर सकाळी ११ वाजेपर्यंत २१.१९ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील दोन तासात १३.७२ टक्के मतदान झाले. यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३७.०९ टक्के मतदान झाले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २८ टक्के मतदान झाले. राजापूर विधानसभा मतदारसंघात ३७.०५ टक्के मतदान झाले. कणकवली विधानसभा मतदारसंघात ३१.५९ टक्के, कुडाळ मतदारसंघात ३२.८८ आणि सावंतवाडी मतदार संघात ३६.६५ टक्के मतदान झाले.

दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील दोन तासात १०.८२ टक्के मतदान झाले. दुपारी उन्हाचा पारा वाढल्याने मतदारांनी काही प्रमाणात निरुत्साह दाखवला. मात्र काही ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. या वेळेत चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४६.७२ टक्के मतदान झाले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ४१ टक्के मतदान झाले . राजापूर विधानसभा मतदारसंघात ४१.६८ टक्के, कणकवली विधानसभा मतदारसंघात ४६.०४ टक्के, कुडाळ मतदारसंघात ४८.४४ आणि सावंतवाडी मतदार संघात ४५.०१ टक्के मतदान झाले.

दुपारी ३ ते ५ केवळ ९ टक्के मतदान

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. या दोन तासात केवळ ९.०२ टक्के मतदान झाले. यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५२.६२ टक्के मतदान झाले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ४९.८३ टक्के मतदान झाले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात ४७.३१ टक्के मतदान झाले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात ५५.१४ टक्के, कुडाळ मतदारसंघात ५९.०९ आणि सावंतवाडी मतदार संघात ६९.०३ टक्के मतदान झाले आहे.

सायंकाळ नंतर मतदान केंद्रावर मोठ्या रांगा

सायंकाळी चार नंतर लोकसभा मतदार संघातील अनेक मतदार संघावर मतदारांनी मोठमोठ्या रांगा लावल्याचे दिसून आले. सायंकाळ नंतर उन्हाचा जोर कमी होताच अनेक भागातील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. सायंकाळी मिरकरवाडा मतदार केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपुष्टात आली. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी सरासरी ६५ टक्के मतदान झाले असून ४ जून रोजी मतदार राजाचा कौल जाहीर होणार आहे.