नारायण राणेंच्या प्रचारासाठी येणाऱ्या अमित शहांच्या सभेची जय्यत तयारी सुरू

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जाहीर प्रचारसभेसाठी येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर भव्य मंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. उन्हाचा त्रास कार्यकर्त्यांना होऊ नये यासाठी उच्चप्रतीचा मंडप उभारण्यात येत आहे.

महायुतीकडून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या सहकारी मंत्र्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा दि.24 एप्रिलला दुपारी जाहीर सभेसाठी येणार आहेत. रत्नागिरीच्या विमानतळावरून ते थेट गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर जाहीर सभेसाठी जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीकडून सभेची जय्यत तयारी सुरू आहे. दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते बसतील एवढा मोठा मंडप उभारण्यात येत आहे. ऊन्हापासून कार्यकर्त्यांचे संरक्षण होईल याची दक्षता भाजपाने घेतली आहे.