हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी:- ढोल ताशांचा गजर आणि रणरणत्या उन्हातून रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी हजारो कार्यकर्त्यांसह रॅलीने जात महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करीत भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेली गाणीही लक्ष वेधून घेत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशात 400 पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याचा संकल्प केलेला आहे. या 400 पार मधील खासदारांमधून सर्वाधिक मताधिक्य नारायण राणे यांना मिळवून देऊ असा विश्वास शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रॅलीमध्ये मार्गदर्शन करताना सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवाचे दर्शन सकाळी घेतले. त्यानंतर मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन रॅलीला सुरुवात झाली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत, माजी खा. निलेश राणे, आमदार नितेश राणे, आ. शेखर निकम, माजी आ. प्रमोद जठार यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रत्नागिरी शहरातील अनेक व्यावसायिक व नागरिकांनी या रॅली दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुढील वाटचालीसाठी व निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरीच्या चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, लांजासह रत्नागिरीचा ग्रामीण भाग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून सकाळपासूनच महायुतीचे कार्यकर्ते उत्साहाने रत्नागिरीत दाखल झाले होते. शहरातील मारुती मंदिर परिसरात यामुळे मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती.

मारुती मंदिर ते जयस्तंभ या दोन किमी अंतरात माळनाका, जिल्हा परिषद, सिव्हील हॉस्पीटल या मार्गावर मोठ्या संख्येने गटागटाने कार्यकर्ते उभे राहून नारायण राणे यांना शुभेच्छा देत होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आपल्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यासोबत चालत होते. जयस्तंभ येथे दोन ट्रकवर स्टेज तयार करण्यात आले होते. याठिकाणी रॅली आल्यानंतर मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात केलेले काम हा ट्रेलर आहे. तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आणखीन पिक्चर स्पष्ट होईल. देश महासत्ता बनेल. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास ही संकल्पना खर्‍या अर्थाने सत्यात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झाले पाहिजे. यासाठी देशातून 400 पेक्षा जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत आणि म्हणून रत्नागिरी सिंधदुर्ग जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांना प्रचंड मताने निवडून देऊया असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना रत्नागिरीचे पालकमंत्री व शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशात 400 पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याचा संकल्प केलेला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांना सर्वाधिक मताने विजयी करुच. मात्र, या 400 पार मधील खासदारांमधून सर्वाधिक मताधिक्य नारायण राणे यांना मिळवून देऊ असा विश्वास ना सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले शिवसेनेकडून किरण भैय्या सामंत इच्छुक होते. मात्र, ज्यावेळी महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली त्याच क्षणापासून आम्ही राणे साहेबांचे काम करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता जोमाने काम करेल. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून सर्व ताकद लावून राणे साहेबांना विजयी करून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केला.