हापूस हंगाम जूनच्या पहिल्या आठवडयापर्यंत

रत्नागिरी:- जानेवारी महिन्याच्या अखेरीस आलेल्या हापूस कलमांच्या मोहोराचे उत्पादन 15 मेनंतर आंबा बागायतदारांच्या हाती लागणार आहे. त्यामुळे यंदा जूनच्या पहिल्या आठवडयापर्यंत हापूसचा हंगाम लांबेल असा अंदाज वर्तविला जात आहे. दरवर्षी मे अखेरीस आंबा हंगाम संपुष्टात येत असतो. त्याचा फायदा निश्‍चित सर्वसामान्यांना होईल.

रत्नागिरी जिल्ह्यातील हापूसचे उत्पादन यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट आले आहे. फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात आंबा बाजारात दाखल झाला होता. त्याचा परिणाम हापूसच्या दरावरही झाल्याचे व्यावसायीकांनी सांगितले. अल निनो आणि ला निनोच्या प्रभावामुळे वातावरणातील बदल आंबा हंगामावरही परिणामकारक ठरलेले आहेत. गतवर्षी आंब्याचे उत्पादन अत्यंत कमी होते. कोकण कृषी विद्यापिठाच्या अहवालानुसार हे उत्पादन 12 टक्केपर्यंतच राहिले. जी झाडे गतवर्षी मोहोरलेली नव्हती, ती यंदा मोठ्याप्रमाणात मोहोरली आहेत. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात पडलेल्या थंडीमुळे अखेरच्या टप्प्यातही कलमांना मोहोर आला. पहिल्या टप्प्यातील उत्पादन हाती येत असतानाच दुसर्‍या टप्प्यातील मोहोर वांज गेला होता. तर तिसर्‍या टप्प्यातील मोहोरावर प्रचंड प्रमाणात थ्रिप्सचा अटॅक झाला. परिणामी दोन्ही मोहोरातून कमी उत्पादन हाती येण्याची शक्यता लक्षात घेऊन बागायतदारांनी शेवटच्या टप्प्यात आलेला मोहोर जतन करण्यासाठी फवारण्या सुरु केल्या. त्या मोहोराला फळधारणा झाली असून त्यामधून 15 मे नंतर उत्पादन हाती येण्याची शक्यता बागायतदारांनी व्यक्त आहे. समुद्रकिनारी परिसरातील बागायतीमधील आंबा काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. उर्वरित परिसरातील बागांत आंबा काढणी जोरात सुरु आहे. सध्या मुंबई, पुण्यासह अहमदाबाद अशा मोठ्या बाजारपेठांमध्ये दिवसाला 60 ते 65 हजार पेटी दररोज जात आहे. याबाबत ज्येष्ठ आंबा बागायतदार जयंत फडके म्हणाले, यंदाचा आंबा हंगाम शेवटपर्यंत राहील. मात्र एपिल महिन्याअखेरपासून ते अगदी 15 मे पर्यंत आंबा खूप कमी राहील. शेवटच्या टप्प्यात आलेल्या मोहोरातील उत्पादन साधारणपणे 10 जूनपर्यंत राहील असा अंदाज आहे.