१३२ सरकारी कर्मचाऱ्यांची निवडणूक कामगिरी रद्द होण्यासाठी धाव

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदार होणार आहे. या लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदार संघ सामाविष्ट असून, त्यासाठी ९ हजार ७८३ मनुष्यबळ निश्चित करण्यात आले आहे. यात प्रत्येक मतदार संघासाठी १० टक्के मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहे; मात्र ही निवडणुक ड्यूटी कशी रद्द होईल यासाठी कर्मचाऱ्यांनी गंभीर आजार, लग्न, मधुमेह, हृदयची शस्त्रक्रिया अशी कारणे देत ही ड्युटी रद्द होण्यासाठी मतदार संघातील १३२ कर्मचाऱ्यांनी विनंती अर्ज केले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ निश्चित करून त्यांचे पहिले प्रशिक्षणही निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. या प्रक्रियेसाठी रत्नागिरीतील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या तीन विधानसभा मतदार संघासाठी ५ हजार १५५ आणि सिंधुदुर्ग मतदार संघातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघांसाठी एकूण ४ हजार ६२८ कर्मचारी असे मिळून एकूण ९ हजार ७८३ कर्मचारी निश्चित झाले आहेत. यापैकी ड्यूटी रद्द करण्यासाठी १३२ जणांनी अर्ज केले आहेत.

हृदयाची शस्त्रक्रिया, तीव्र मधुमेह यासारख्या आजारांची कारणे ड्यूटी रद्द करण्यासाठी नमूद केली आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे गंभीर आजारपण तर काही महिलांची प्रसूती अडचणीची असल्याने अशा गरोदर महिलांनी हे कारण दिले आहे तर काही दिव्यांग व्यक्तींना निवडणुकीच्या कामावर जाताना अडचण येणार असल्याने ड्यूटी रद्द करण्याची मागणी केली आहे. यापैकी अतिशय गंभीर कारणे असतील तरच त्यांची ड्यूटी रद्द करण्यात येणार आहे; मात्र, किरकोळ कारणे असतील तर त्यांची ड्यूटी कायम करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना काम करावेच लागणार आहे.

स्वतःच्या लग्नासाठी अर्ज
निवडणुकीच्या कामासाठी काढलेल्या काही कर्मचाऱ्यांचे लग्न याच कालावधीत आधीच ठरले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनीही ड्युटी रद्द करण्यासंदर्भात अर्ज दिले आहेत.