वरवडेत सादर झालेल्या ‘वीर रत्न बाजीप्रभू’ नाटकाने जिंकली प्रेक्षकांची मने

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावात चंडिका मातेचा शिमगोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या शिमगोत्सवानिमित्त गावात ‘ वीर रत्न बाजीप्रभू ‘ नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या या प्रयोगाने प्रेक्षकांची अक्षरशः मने जिंकली. नाटकाच्या रूपाने गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी प्रभूच अवतरले अशी भावना सर्वांची झाली होती.

वरवडे गावातील चंडिका मातेच्या शिमगोत्सवाला १०८ वर्षांची परंपरा आहे. देवीच्या मांडाची परंपरा जपत असताना वरवडे भंडारवाडा मधील बोरकर वठारातील कलाकारांनी वीर रत्न बाजी प्रभू हे नाटक देवीच्या मांडला सादर केले. विद्याधर शिवणकर लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक नूतन बाल मित्र बोरकर संगीत नाट्य मंडळ वरवडे, रत्नागिरी या संस्थेच्या माध्यमातून सादर करण्यात आले.

ऐतिहासिक नाटकाचे सादरीकरण करताना दमदार अभिनय, उत्कृष्ट संवाद, आणि तितक्याच तोडीची ध्वनी यंत्रणा यामुळे या नाटकाने प्रेक्षकांची अक्षरशः मने जिंकली. अनेक वर्षानंतर एक दर्जेदार ऐतीहसिक नाटक पाहायची संधी मिळाली अशी भावना यावेळी प्रेक्षकांनी व्यक्त केली. या ऐतिहासिक नाटकामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रणय बोरकर, बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका पंकज बोरकर, सिद्दी जोहरची भूमिका निलेश बोरकर , शिवा काशीदची भूमिका स्नेहल खेडेकर यांनी अतिशय ताकदीने पेलवली. याशिवाय इतर सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका अतिशय उत्कृष्टपणे पार पाडत नाटक उचलून धरले.