जिल्हा बँकेला 68 कोटींचा विक्रमी ढोबळ नफा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन 2023-24 या आर्थिक वर्षात 68 कोटी 53 लाख रुपयांचा ऐतिहासीक विक्रमी ढोबळ नफा झाला आहे. पुढील आर्थिक वर्षात पाच हजार कोटी रुपयांचा व्यवसाय, शंभर कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळण्याचे नियोजन बँकेने केल्याची माहिती अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात केलेल्या व्यवसायाची माहिती डॉ.तानाजीराव चोरगे यांनी दिली. उपाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ.सुधीर गिम्हवणेकर आदी मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

आर्थिक वर्षअखेर बँकेच्या ठेवी 2592 कोटी 81 लाख रुपयांच्या, कर्जव्यवहार 1961 कोटी रुपये असा एकूण 4553 कोटी 83 लाख रुपयांचा एकूण व्यवसाय झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेने ठेवींमध्ये 182 कोटी 73 लाख रुपये, कर्जव्यवहारात 298 कोटी 97 लाख रुपये, ढोबळ नफ्यात 21 कोटी 20 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. बँकेचा ढोबळ एनपीए 2.41 टक्के असून नक्त एनपीए शुन्य टक्के आहे. सलग बारा वर्षे बँकेचा एनपीए शुन्य टक्के आहे. सलग तेरा वर्षे बँकेने ‘अ’ ऑडीट वर्ग प्राप्त केल्याची माहिती डॉ.तानाजीराव चोरगे यांनी दिली.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या विविध कर्जमाफी योजनांची जिल्हा बँकेने प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. राज्य शासनाकडून यापोटी 18 कोटी रुपयांची रक्कम अद्यापही बँकेला देणे आहे. राज्यातील 25 साखर कारखान्यांना दिलेल्या 900 कोटी रुपयांची कर्जवसुली यंदा प्रथमच 100 टक्के झाल्याची माहिती डॉ.तानाजीराव चोरगे यांनी दिली.
नाबार्ड, आरबीआय यांची बंधने जिल्हा बँकेवर असून त्यानुसार कार्यालयीन कामकाज सुरू असते. राष्ट्रीय बँकांसह अर्बन बँका, पतसंस्था यांच्यावर नाबार्ड, आरबीआयचे कोणतेही बंधन नसल्याने ठेवींवर ते मनाप्रमाणे व्याज देऊ शकतात. कर्ज वितरणातील व्याजार दर ठरविण्याची जबाबदारी स्वतः राष्ट्रीय बँका, अर्बन बँका, पतसंस्था घेत असल्याचे डॉ.तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेतर्फे शंभर संगणक संच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सन 2023-24 या आर्थिक जिल्हा बँकेने प्राथमिक शाळांना 50 संगणक संच दिले आहेत. सन 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला उर्वरित 50 संगणक संच जिल्हा परिषद शाळांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ.तानाजीराव चोरगे यांनी दिली.