बंद पडलेल्या शाळांचे दरवाजे पुन्हा उघडणार; विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर मतदानासाठी

रत्नागिरी:- पटसंख्येअभावी बंद पडलेल्या शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या ४३ शाळा दि.७ मे ला मतदानाच्या दिवशी पुन्हा उघडणार आहेत. त्यापैकी अनेक शाळांची पडझड झालेली आहे. त्या शाळांची दुरुस्ती करण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषद बांधकाम विभागासमोर आहे.
गेल्या काही वर्षात पटसंख्येअभावी जिल्ह्यातील अनेक शाळा बंद पडल्या. २०१९ नंतर गेल्या पाच वर्षात शाळा बंद असल्यामुळे दुरुस्तीकडे कोणी लक्ष दिले नाही. बंद पडलेल्या शाळांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. या बंद पडलेल्या शाळांची गरज मतदानादिवशी लागलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ४३ शाळा या पटसंख्येअभावी बंद पडलेल्या आहेत. या बंद पडलेल्या शाळा दि. ७ मे ला मतदानादिवशी उघडणार आहेत. मात्र मतदानाच्या वेळी निवडणूक अधिकार्यांसह मतदारांची गैरसोय होऊ नये याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

४३ शाळांपैकी ज्या शाळांची पडझड झालेली आहे किंवा दुरावस्था झालेली आहे, अशा शाळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच शाळांच्या अवतीभोवती स्वच्छता मोहिम राबवण्यात आली आहे. जि.प. बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. सुसज्ज मतदान केंद्र उभारणे आवश्यक असल्याने या बंद पडलेल्या शाळांवर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
मतदानासाठी आता महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिल्यामुळे या शाळांच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. काही ठिकाणी शौचालय नाहीत ती शौचालये उभारावी लागणार आहेत. काही शाळांचे छप्पर नाही तर काही शाळांची दारे आणि खिडक्या नादुरुस्त झाली आहेत. ही सर्व दुरुस्तीची कामे जि.प. बांधकाम विभाग करत आहे. मतदानामुळे या बंद पडलेल्या ४३ शाळा पुन्हा सुसज्ज होत आहेत. त्याव्यतिरिक्त जिल्ह्यातील १९६ शाळांची दुरुस्ती सुरु आहे.