कोमसापचे रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन संपन्न

दोन दिवस विविध उपक्रमाचे यशस्वीपणे आयोजन

मालगुंड:- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्ह्याचे रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

दोन दिवसीय संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळ सत्रात बदलते कोकण या विषयांवर परिसंवादात रमेश कीर, सतीश कामत, विनायक हातखंबकर आणि नितीन जोशी यांनी अनुक्रमे पर्यटन व उद्योग, पत्रकारिता, शिक्षण आणि सांस्कृतिक या क्षेत्रातील बदलाची माहिती देत या परिसंवादाचे संवादक ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांनी चर्चा घडवून आणली.
या परिसंवादानंतर कवितेच्या गावा जावे हा कविता वाचन व सादरीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, एल. बी. पाटील, अनुपमा उजगरे, नमिता कीर, बाळासाहेब लबडे यांनी कविता सादर केल्या. यावेळी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे यांच्यासह वरील कविता सादर उत्साह निर्माण केला. या कविता सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महत्वाचे म्हणजे वया संमेलनात बाल साहित्याच्या प्रांगणात हे सत्र घेण्यात आले. यासाठी भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा आणि त्यातून केलेल्या सादरीकरणाला मान्यवर साहित्यिक आणि प्रेक्षकांनी दाद देत चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मराठी भाषा प्रेमाचे कौतुक केले.
दुपार सत्रात अमेय धोपटकर आणि अरुण मोर्ये यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यातील नवोदित कवींचे कवी संमेलन घेण्यात आले. या कविसंमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाखांचे तब्बल सव्वीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या कविसंमेलनात सर्व कवींना निवेदक शाहिद खेरटकर यांनी बोलते केले.

समारोप कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख यांनी सर्व साहित्यप्रेमी आणि साहित्य रसिकांचे कौतुक करत सर्वाना धन्यवाद दिले. तर ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनीही चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून मराठी भाषेचा गोडवा दिसून येतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा समावेश हा खऱ्या अर्थाने मराठी भाषा निरंतर असल्याचे दर्शविणारा असल्याचे मत व्यक्त केले. संमेलनाध्यक्षा डॉ. अनुपमा उजगरे यांनी मराठी भाषा आणि मराठी साहित्याच्या प्रचार व प्रसारासाठी अशी साहित्य संमेलन आयोजित करण्याची गरज असल्याचे सांगत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संमेलन समितीचे प्रमुख रमेश कीर यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन समिती कार्याध्यक्ष गजानन पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष आनंद शेलार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाखांनी विशेष प्रयत्न केले.

या संमेलनाच्या समारोप प्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, संमेलनाध्यक्ष डॉ. अनुपमा उजगरे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, लोकप्रिय कवी अशोक नायगावकर, प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, मुंबई जिल्हा अध्यक्ष लता गुठे, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता पातेवार यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात साहित्यप्रेमी आणि साहित्यरसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या संमेलनात विविध विषयांवर चर्चा घडून आल्याने आणि विविध उपक्रमांचा, प्रसिद्ध साहित्यिक यांचा सहवास आणि त्यांच्या साहित्याचा अनुभव अगदी प्रत्यक्षपणे घेण्याची संधी उपलब्ध झाल्याने सर्व साहित्यप्रेमी आणि साहित्य रसिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेला धन्यवाद दिले.

जिल्ह्याचा विकास आराखडा अद्यापही कागदावरच : रमेश कीर

जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा अद्यापही तयार झालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्याचा विकास नेमका कोणत्या बाजूने करायचा. औद्योगिक विकास करायचा की फलोत्पादन क्षेत्रात विकास करायचा याबाबत निश्चित धोरण तयार नाही. मत्स्य व्यवसाय धोरण एका बाजूला आहे. मत्स्यव्यवसायाला कशा पद्धतीने उभारी द्यायची याबाबत शाश्वती नाही. एका बाजूल रिफायनरीचे समर्थन आणि दुसरीकडे फलोत्पादन याबाबत मास्टर प्लॅनच नाहीय त्यामुळे जिल्ह्याचा विकास होत नाही असे रोखठोक मत परिसंवादा दरम्यान उद्योजक रमेश कीर यांनी व्यक्त केले.