कोकणात साहित्यिक पिढी तयार झाली, ही खूप समाधानाची बाब: डॉ.अनुपमा उजगरे

मालगुंड येथे रत्नागिरी जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन!

गणपतीपुळे:- साहित्य पचविण्याची कोकण ही सुपीक अशी भूमी आहे .या कोकणात साहित्यिक पिढी मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे ही खूप समाधानाची आणि आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका तथा कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा रत्नागिरी आयोजित तिसऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी केले .

कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा रत्नागिरी आयोजित तिसरे रत्नागिरी जिल्हा मराठी साहित्य संमेलन मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकातील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक व्यासपीठ आणि स्वर्गीय अण्णासाहेब राजवाडकर साहित्य नगरीत शनिवार दिनांक ६ एप्रिल 2024 पासून सुरू झाले आहे या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व व श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून संमेलन अध्यक्षा तथा जेष्ठ साहित्यिका डॉक्टर अनुपमा उजगरे या अध्यक्षीय मनोगतातून बोलत होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कोमसाप च्या कार्यप्रणालीबाबत अतिशय चांगले विचार व्यक्त केले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की ,या ठिकाणी पद्मश्री मधुभाई मंगेशकर यांनी कोमासपाच बीज रोवले आणि त्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणात संवर्धन केले त्यातूनच आता साहित्यिक पिढी तयार होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त करून ही खूप आनंदाची बाब असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा साहित्य संमेलनातून कौशल्यपूर्ण व नाविन्यपूर्ण असे आयोजन केले जात आहे, याचा देखील तितकाच आनंद वाटतो असे त्या म्हणाल्या. त्यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक अशोक नायगावकर यांनीही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आजच्या नव्या पिढीने दर्जेदार साहित्य निर्माण करून आणि साहित्य चळवळीकडे वळले पाहिजे असे मत व्यक्त केले . तसेच या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून साहित्याबद्दल आपले विचार करून आजच्या तरुण साहित्यिकांनी साहित्य चळवळ अधिक वृंदीगत करावी असेच मत व्यक्त केले. या जिल्हा साहित्य संमेलनाचा शुभारंभ मालगुंड येथील दत्त मंदिर ते कवी केशवसुत स्मारकापर्यंत वाजतगाजत ढोल ताशांच्या गजरात साहित्य ग्रंथदिंडी काढण्यात आली यामध्ये मालगुंड परिसरातील शालेय विद्यार्थी विविध पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी ग्रंथ दिंडी खास आकर्षण ठरली त्यानंतर या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने तिसऱ्या रत्नागिरी जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर विचारपीठावरील प्रमुख मान्यवरांचा सन्मान कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी जिल्हा यांचे वतीने करण्यात आला तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत संमेलन समितीच्या वतीने करण्यात आले.या उद्घाटन कार्यक्रमाल उद्घाटक तथा ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, स्वागताध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उर्फ अण्णा सामंत, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, विश्वस्त तथा संमेलन समिती प्रमुख रमेश कीर, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा संमेलन कार्याध्यक्ष गजानन ऊर्फ आबा पाटील, संमेलन कार्यवाह तथा केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, संमेलन कोषाध्यक्ष तथा कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, संमेलन सहकार्यवाह विलास राणे, संमेलन सहकोषाध्यक्ष अरुण मोर्ये, मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर, कोमसापचे मालगुंड शाखेचे सदस्य शेखर खेऊर, अध्यक्षा नलिनी खेर, कार्याध्यक्षा शुभदा मुळये आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून साहित्यिक व कवी उपस्थित होते. या साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी पुस्तक सांगतात खूप काही हा विशेष परिसंवाद सादर करण्यात आला. यानंतर दुपार सत्रात युवक आणि समाज माध्यमांवरील लेखन हा परिसंवाद झाला.त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन सादर करण्यात आले. यांमध्ये ज्येष्ठ कवी अरूण नायगावकर, अरुण म्हात्रे , देविदास पाटील सुधीर शेठ, प्रवीण दवणे, रुजारियो पिंटो, उषा परब, लता गुठे, आकांक्षा भुर्के आदींनी सहभाग घेतला. या संमेलनाची सांगता उद्या रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी होणार आहे या दुसऱ्या दिवशीच्या संमेलनात सकाळ परिसंवाद, कवितेच्या गावा जावे,बालसाहित्याच्या प्रांगणात, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील कवींचे कवी संमेलन आणि समारोप होणार आहे.