खेळाडूंच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय

रत्नागिरी:- क्रीडा क्षेत्रात भूषणावह कामगिरी करणारे खेळाडू राज्य व देशाची शानच असतात. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी करणाच्या खेळाडूंच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे.

किताबप्राप्त कुस्तीगिरांप्रमाणेच तिपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंना आता दरमहा साडे सात हजार रुपये मिळणार आहेत.
विशेष म्हणजे 12 वर्षांनंतर ही वाढ करण्यात आली आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या राज्यातील खेळाडूंना सन्मानपूर्वक मानधन देण्याची योजना दि. 10 जून 1993 पासून सुरू झाली. त्यानंतर म्हणजे दि. 5 फेब्रुवारी 1998 साली मानधनात वाढ करण्यात आली. ही वाढ 2010 आणि 21 डिसेंबर 2012 लाही सुरूच होती. 2012 नंतर मात्र खेळाडूंच्या मानधनात वाढच झाली नाही. ही वाढ तब्बल 12 वर्षे रखडली. एक तपानंतर सरकारने राज्यातील खेळाडूंना न्याय देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडुंना 2 हजार 500 मानधन मिळत होत ते आता प्रति महिना 7 हजार 500 रुपये इतके मिळणार आहे.
आशियाई खेळाडुंना चार हजार मानधन मिळत होेते ते आता 10 हजार मिळणार आहेे. ऑलिम्पिक, अर्जुन पुरस्कार आणि सर्व केसरी प्राप्त खेळाडूंचे मानधन 6 हजारांहून थेट 15 हजार रुपये केले आहे.