संमती नसताना कुंपणावर राजकीय बॅनर लावल्याची तक्रार

खेड:- लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेतील रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे. संमती नसताना घराच्या कुंपणावर राजकीय बॅनर लावल्याची तक्रार व्यावसायिक सदानंद कदम यांनी खेड पोलिसात दिली आहे.

रामदास कदम आणि आपले कौटुंबिक वाद सर्वश्रुत असताना राजकीय फायद्यासाठी माझी बदनामी होत असल्याचा आरोप सदानंद कदम यांनी केला आहे. प्रशासनाने हा बॅनर काढावा अन्यथा आपण स्वतःहून काढणार असल्याचेही श्री. कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सदानंद कदम यांच्या जामगे येथील घराच्या कंपाउंडवर त्यांची संमती नसताना बॅनर लावला गेला आहे. या बॅनरवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायद्यासाठी आपला फोटो लावला आहे. सोबत आमदार योगेश कदम यांचा व अन्य लोकांचे फोटो लावण्यात आले आहेत. हा राजकीय डाव असून, आपले रामदास कदम यांच्याशी कौटुंबिक वाद आहेत. मोठ्या संकटातून मी नुकताच बाहेर पडलो आहे. अशा स्थितीत राजकीय फायद्यासाठी माझ्या घरावर अनधिकृतरीत्या तसेच परवानगी नसताना लावण्यात आलेला बॅनर तात्काळ हटवावा अन्यथा मला स्वतःला हटवावा लागेल. हे करत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करावी, असेही श्री. कदम यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.