डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील तोडफोड प्रकरणी नागरिक संतप्त

रत्नागिरी:- एका माथेफिरु तरुणाने जिल्हा शासकिय रुग्णालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी तोडफोड केली. ही घटना शुक्रवार 1 मार्च रोजी पहाटेच्या 3.30 वा. सुमारास घडली.याबाबत माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी पुतळ्याजवळ जमा होउन या कृत्याचा घोषणा देत निषेध केला.

शुक्रवारी पहाटे हा माथेफिरु त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यावर उपचार घेण्यासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात आला होता. त्याठिकाणी उपचार करुन घेतल्यावर तो जिल्हा शासकिय रुग्णालयातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाउन पुतळ्याच्या बाजुला असलेल्या काही सामानाची तोडफोड केली. त्याच सुमारास तिथून गस्तीवरील पोलिस कर्मचारी जात असताना त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने त्या माथेफिरुला आपल्या ताब्यात घेतले. त्याची वैद्यकिय तपासणी केली असता वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्याला मनोरुग्णालयात पाठवण्याचा सत्ला पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याची मनोरुग्णालयात रवानगी केली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकाराची माहिती मिळताच संतप्त नागरिक घटनास्थळी जमा झाले होते. त्यांना शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांनी शांत केले. या घटनेचा सीसीटिव्ही फूटेज तपाण्यात येणार असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.