रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी दीडशे कोटींच्या कामांना मंजुरी

रत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने दीडशे कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून यातून नवीन टर्मिनल इमारतीसह लिंक टॅक्सीवे, जोडरस्त्यांसह अन्य कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी याकडे विशेष लक्ष दिल्यामुळेच या कामाला वेग मिळाला आहे. ही कामे पूर्णत्व:ला गेल्यानंतर रत्नागिरीतून प्रवासी विमानाचे टेकऑफ होणार आहे.

केंद्र शासनाच्या रिजनल कनेक्टीव्हीटी स्कीम अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आलेला असल्यामुळे येथील विकासकामांना वेग देण्यात आलेला आहे. सध्या हे विमानतळ भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. यापूर्वी या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1372 मीटर होती ती आता 2135 मीटर वाढवण्यात आली आहे. यासाठी 25 हेक्टर जमीनही संपादीत करण्यात आली आहे.

सध्या विमानतळ तटरक्षक दलाकडे असल्याने प्रवासी वाहतुकीसाठी वेगळे टर्मिनल, रस्ते उभारण्याचे काम होती घेण्यात येणार आहे. यापूर्वी यासाठी जवळपास 97 कोटी रुपयांची मान्यता 2022मध्ये मिळाली होती. परंतु आणखी जागेचे भूसंपादन व वाढत्या महागाईमुळे या कामांच्या किंमतीत वाढ झाल्याने सुमारे दीडशे कोटींची आवश्यकता होती. या निधीला प्रशासकीय व वित्तीय मान्यता राज्य शासनाने दिली आहे. जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांसाठी प्रयत्नशील होते. उद्योग व्यवसायासाठी रत्नागिरीकरांसाठी विमानसेवेचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. त्यामुळे निधीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

नवीन टर्मिनल इमारती 30 कोटी व्यतिरिक्त उडान विमान सेवा सुरु करण्या करीता आवश्यक असा 14 हजार चौ.मी. क्षेत्राचा अ‍ॅप्रॉन, 225 मीटर लांबीचा लिंक टॅक्सी वे, विमानतळा करीता 2 कि.मी.चा जोडरस्ता, 2 कि.मी.ची संरक्षक भिंत, विद्युत व पाणी पुरवठ्यासह अन्य कामांसाठी 36.60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भूसंपादनासाठी आणखी निधीची आवश्यकता असून त्यासाठी सुमारे 66 कोटी 22 लाख रुपयांना मान्यता दिली आहे. विमानतळाच्या परिचालन व देखभालीसाठी 6 कोटी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या कार्यालय आस्थापनेसाठी सव्वाकोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या विकास कामांना येत्या काही दिवसात सुरुवात होणार असून, त्यामुळे प्रवासी विमान वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.