आशा, गट प्रवर्तक महिला आंदोलनाची धार करणार अधिक तीव्र

रत्नागिरी:- आशा व गट प्रवर्तकांचे शासनाकडे केलेल्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन सुरूच आहे. हे बंमुदत संपाचे आंदोलन आता अधिक तीव्र करण्यात आले आहे, सोमवार 26 फेब्रुवारी पर्यंत जर महाराष्ट्र शासनाने मानधन वाढ संदर्भात जीआर काढला नाही तर याचदिवसापासून मुंबई आझाद मैदान येथे जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी जोरदार भागीदारी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशन च्या जनरल सेकेटरी सुमन शंकर पुजारी यांनी केलेले आहे. या पुकारलेल्या बेमुदत संपात जिह्यातील एकूण 1 हजार 333 आशांपैकी 889 आशा सहभागी झालेल्या होत्या. आशा व गटप्रवर्तक महिला यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेला संप शासन जीआर काढत नाही, तोपर्यंत सुरूच ठेवायचा, या निर्णयावर संघटना ठाम राहिलेली आहे. त्यामुळे संपाची तीव्रता वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जिह्यात जावून हे आंदोलन करण्यात आले.

गेली अनेक वर्षे आशा व गटप्रवर्तक महिला विविध मागण्यांसाठी आंदोलने करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संघटनेने बेमुदत संपाची हाक दिल्यानुसार 12 जानेवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांचा लढा आता तीव्र झालेला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकवेळा आंदोलने, बेमुदत संप करून सुद्धा त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणून पुन्हा एल्गार पुकारण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ठाण्यामध्ये तीस हजार महिलांनी जाऊन मागण्या मंजूर करण्याची मागणी केली. 1 ऑक्टोबर 2023 रोजी बेमुदत संपाची नोटीस दिल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या मंजूर केलेल्या नाहीत. त्यामुळे 12 जानेवारी नंतर अनेक वेळा चर्चा होऊन सुद्धा महाराष्ट्र शासनाने अद्याप शासकीय आदेश काढलेला नाही. सरकारच्या या कृत्याचा महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनने तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे.