मराठा आरक्षण मिळताच रत्नागिरीत मराठा बांधवांकडून जल्लोष

रत्नागिरी:- गेल्या अनेक दिवसांची असलेली स्वतंत्र मराठा आरक्षणाची मागणी शासनाकडून मान्य होताच रत्नागिरीतील मराठा समाजाने मोठा आनंदोत्सव साजरा केला. ‘एक मराठा…लाख मराठा’!…‘जय जिजाउ…जय शिवराय’! अशा आनंदी घोषणांचा एकच हुंकार उमटला.

राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणावरून गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार विषय ऐरणीवर आलेला होता. त्यासाठी जोरदार आंदोलनने या समाजाकडून सुरू होती. कोकणातील मराठा समाजाने तर शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवला होता. अखेर शासनाने या समाजाची असलेली स्वतंत्र मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली. या समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण जाहीर केले. हे आरक्षण शिक्षण आणि नोकरींमध्ये मिळणार आहे.

त्याबद्दल रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळाच्या माध्यमातून बुधवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मारूतीमंदिर सर्पल येथे यादिवशी सकाळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर एक मराठा…लाख मराठा अशा घोषणांनी येथील सारा परिसर दणाणून गेला. यावेळी मराठा समाजाचे पदाधिकारी राकेश नलावडे, केशवराव इंदुलकर, संतोष तावडे, सुधाकरराव सावंत, आप्पा देसाई, मनोज साळवी, प्राची शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. लवकरच शासनाच्या माध्यमातून या समाजासाठी असलेल्या लाभाच्या योजना गावागावातील समाजबांधवापर्यंत पोहचवण्याचा निर्धार मान्यवरांनी व्यक्त केला आहे.