जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

रत्नागिरी:- जिल्ह्यात बारावीच्या परिक्षेला बुधवापासून सुरळीत वातावरणात प्रारंभ झालेला आहे. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडलेला नसून गडबड, गोंधळाविना जिल्ह्यातून एकूण 17 हजार 489 विद्यार्थी परिक्षा देत आहेत.

21 फेब्रुवारीपासून बारावीच्या परिक्षेला प्रारंभ झालेला आहे. या परीक्षेसाठी कोकण बोर्डामार्फत कडक नियोजन आखण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त पार पडावी यासाठी राज्य मंडळाची व कोकण विभागीय मंडळाकडून निगराणी ठेवली जात आहे. या बारावी परिक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 154 कनिष्ठ महाविद्यालये आणि मुख्य परिक्षाकेंद्र 38 आहेत. या परिक्षा केंद्रांवर बुधवारी पहिल्याच दिवशी पेपर सुरू होण्याअगोदरच वेळेत विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांचे पालकवर्गही आवर्जून उपस्थित होते.

विविध माध्यमांद्वारे अफवा पसरविणाऱ्या विरोधात होणार कारवाई
इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी परीक्षा कालावधित विविध माध्यमांद्वारे तसेच सोशल मीडियावर परीक्षेच्या अनुषंगाने अफवा प्रसारित केल्यास व विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केल्यास बातम्या पसरविणाऱ्यांच्या विरोधात मंडळामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पुणे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिला आहे. परिक्षा कालावधीत विद्यार्थी व पालकांची कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन केले आहे.