रनपची अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली; वर्षभरात केवळ चार कारवाया

रत्नागिरी:- शहरातील फुटपाथ, कॉर्नरवर ठिकठिकाणी खोके आणि विक्रेत्यांचे अतिक्रमण सुरू असताना रत्नागिरी नगर परिषदेचा अतिक्रमण हटाव विभाग मात्र सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरात रनपचा अतिक्रमण हटाव पथक विभाग खुर्चीवरून देखील हलला आहे की नाही असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षभरात अतिक्रमण विभागाने केवळ चार कारवाया करण्यात आल्या आहेत.

शहरातील रस्त्यांवर हातगाड्या, स्टॉल लावून फळे, भाज्या, अन्य साहित्य विक्री करत असल्यामुळे वाहतुकीला तसेच पादचाऱ्यांना होणारा अडथळा विचारात घेता नगर परिषदेकडून हातगाड्या मालासह ताब्यात घेतल्या जातात. त्यावेळी फळे, भाज्या या नाशवंत असल्याने शहरातील निरीक्षणगृहास दिल्या जातात. दंडात्मक रक्कम भरल्यानंतरच हातगाड्या ताब्यात दिल्या जातात. जप्त साहित्य अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या ताब्यात असते. शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषदेकडे एक पथक असून, त्यावर मुख्याधिकारी यांचे नियंत्रण असते. केलेल्या कारवाईची नोंद पथकाकडे असते. सामान जप्त करण्याबरोबर दंड आकारणी करण्याचा अधिकार पथकाला आहे. गेल्या वर्षभरात अवघ्या चार कारवाया करण्यात आल्या आहेत.

अतिक्रमण हटाव मोहिमेचा धस्का, शहरातील रस्त्यांची कामे सुरू असल्याने सध्या हातगाड्या रस्त्यावर लावल्या जात नाहीत. जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात अधिक कारवाई नसल्यामुळे हजार रुपयेच दंड वसूल झाला आहे. कारवाईवेळी साहित्य हातगाडीसह जप्त केले जाते. जप्त केलेले साहित्य पथकाच्या ताब्यात असते. दंड भरून साहित्य परत दिले जाते. जप्त केलेल्या हातगाड्या किंवा स्टाॅलवरील फळे, भाज्या नाशवंत असल्याने निरीक्षणगृहासाठी दिल्या जातात. अन्य साहित्य जप्त केले जाते. सध्या तरी रस्त्यावरील अतिक्रमण कमी असून, रस्ते मोकळे आहेत. त्यामुळे कारवाई कमी झाली आहे. कारवाई वेळी साहित्य जप्त करून दंड आकारणी केली जाते, असे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.