रत्नागिरीत तीन ठिकाणी वणवा; बागांचे दहा लाखांचे नुकसान

रत्नागिरी:– तालुक्यात तिन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीमध्ये आंबा, काजूसह विविध बागांचे सुमारे आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे. आगीचे मुुळ कारण समजले नसले तरीही आजबाजूच्या परिसरातील आग बागांमध्ये शिरल्याचे सांगितले जात आहे. तिनही ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागामध्ये हलके वारे वाहत आहेत. त्याचा फटका रत्नागिरी तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला आहे. आज दिवसभरात ठिकठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. भातशेतामध्ये भाजावळ करीत असताना आग पसरल्यामुळे नुकसान झाल्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. नुकसान झालेल्यामध्ये जयगड महसूल मंडळातील वाटद -मिरवणे गावात अचानक लागलेल्या वणव्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील सुमारे सात खातेदारांच्या आंबा बागा जळून भस्मसात झाल्या आहेत. यामध्ये सुमारे दोनशेहून अधिक झाडांचा समावेश आहे. त्यात सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दुसर्‍या प्रकरणामध्ये दाभिळ-आंबेरे येथील संजय भालचंद्र पाटकर यांच्या कलम बागेला आग लागुन अंदाजे 3 लाख 75 हजार रुपये इतके नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक लोकांच्या प्रयत्नातून आग विझवण्यात यश आले. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. त्याचबरोबर करबुडे येथील बागायतदार सावंत यांच्या आंबा बागेतील 100 ते 125 झाडे जाळून खाक झाली. या बागेतील बहूसंख्य झाडांना कैरी आणि मोहोर होता. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही आग शेजारी भाजावळ करताना लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

दिवसभरात ठिकठिकाणी लागलेल्या आगीमध्ये आंबा, काजूचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे. वार्‍यामुळे आग वेगाने पसरली होती.

  • माधव बापट, कृषी विभाग